आषाढीत हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; बकरी ईदला ‘कुर्बानी’ न देता वारकऱ्यांचे करणार स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 04:56 PM2022-07-07T16:56:35+5:302022-07-07T17:03:15+5:30
छोट्या पंढरपुरात हिंदू-मुस्लीम समाजबांधवांनी एकत्रित बैठक घेऊन आषाढी यात्रा व बकरी ईद एकत्रित साजरी करण्याचा निर्णय घेतला.
वाळूज महानगर (औरंगाबाद) : छोट्या पंढरपुरात हिंदू-मुस्लीम बांधवांनी ऐक्याचे दर्शन घडवीत यंदा बकरी ईद व आषाढी यात्रा एकत्रित साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढी यात्रेच्या दिवशीच बकरी ईद असल्याने दोन दिवस मांस विक्रीची दुकाने बंद ठेवून व यात्रेच्या दिवशी ‘कुर्बानी’ न देता वारकऱ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षी आषाढी यात्रेनिमित्त छोट्या पंढरपुरात मोठी यात्रा भरते. येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जिल्हाभरातून वारकरी व भाविकांचा जनसागर उसळत असतो. यंदा योगायोगाने आषाढी यात्रा व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने हिंदू-मुस्लीम बांधवांनी हे दोन्ही उत्सव एकत्रित साजरे करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी एमआयडीसी वाळूज ठाण्यात पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी हिंदू-मुस्लीम बांधवांची बैठक घेतली.
नंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हिंदू-मुस्लीम बांधवांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यात माजी सरपंच शेख अख्तर, महेबूब चौधरी, श्री विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी मार्गदर्शन केले. जामा मस्जिदचे आमिर सलीम पटेल, कमिटीचे सदर महेबूब चौधरी, पेशइमाम मुफ्ती अ.अलीम, हाफीज अब्दुल रशीद, हाफीज असलम, हाफीज एकबाल, हाफीज मुश्ताक, बापू पठाण, जावेद शेख, अक्रम पटेल आदींची उपस्थिती होती.