हिंगोली जिल्ह्यात रबीच्या ७८ टक्के पेरण्याच पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 04:51 PM2019-12-21T16:51:52+5:302019-12-21T16:53:56+5:30
यंदा परतीच्या पावसाने रबीच्या पेरण्यांना मोठा विलंब झाला.
हिंगोली : जिल्ह्यात रबीची रखडलेली पेरणी कॅनॉलला पाणी आल्याने काही प्रमाणात वाढली आहे. आता रबीची पेरणी ७८ टक्के आटोपली असून काहींना विलंबाने पाणी मिळाल्याने अजूनही पेरणी करण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
यंदा परतीच्या पावसाने रबीच्या पेरण्यांना मोठा विलंब झाला. त्यातही शेतकऱ्यांना अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी शेतातच सुड्या ठेवण्याची वेळ आली होती. तर काहींनी काढणीची पसरच पंचनाम्यात दिसावी म्हणूनही विलंब केला. त्यामुळे दीपावलीनंतरही बराच काळ ही शेत रिकामे झाले नव्हते. त्यानंतर मशागत व इतर कामांत वेळ गेल्याने रबीच्या पेरण्या लांबल्या होत्या. त्यातही विजेची समस्या व कॅनॉलचे पाणी मिळत नसल्याने अनेकांना पेरणी करण्यास विलंब झाला. यंदा गव्हाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता होती. मात्र उसाची लागवड वाढल्याने गव्हाचा पेरा त्या तुलनेत कमी झाला आहे. गहू ४४ हजार हेक्टरवर अपेक्षित असताना १८ हजार ४७३ हेक्टरवर पेरणी झाली. हरभऱ्याचा पेरा मात्र वाढला असून ७२ हजार ८५६ हेक्टरवर अपेक्षित असताना ९१ हजार ४७२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याचबरोबर रबी ज्वारी १२ हजार ५१ हेक्टरवर अपेक्षित असताना ७५४१ हेक्टर, रबी मका हजार हेक्टरवर अपेक्षित असताना ४२0 हेक्टर, इतर तृणधान्य ५0९ हेक्टर अपेक्षित असताना १८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा दोन लाख हेक्टरवर रबी पेरणी अपेक्षित होती. मात्र तेवढे क्षेत्र गाठता आले नसल्याचे चित्र असून आणखी पेरणी सुरूच आहे.
कळमनुरी, वसमतचे रबीचे क्षेत्र घटले
यंदा कळमनुरी व वसमत तालुक्यात रबीची पेरणी कमी झाली. मात्र या दोन्ही तालुक्यांत उसाचे क्षेत्र वाढले आहे. कळमनुरीत अपेक्षित ४0 हजार ५६६ पैकी २७४0७ हेक्टर तर वसमतला ४१८0८ हेक्टरपैकी १८८0३ हेक्टरवर पेरणी झाली आहे.४औंढा नागनाथ तालुक्यात १५ हजार हेक्टरवर रबीची पेरणी अपेक्षित असताना १९ हजार ९३४ हेक्टरवर झाली. सेनगावात २१ हजार ६९२ हेक्टर अपेक्षित असताना २१ हजार ६११ हेकटरवर झाली. तर हिंगोलीत ३0 हजार ५0२ हेक्टरवर अपेक्षित असताना ३0 हजार ३३४ हेक्टरवर पेरणी झाली. जिल्ह्यात काही प्रमाणात सुर्यफूल, करडई, जवस आदी पिकेही घेण्यात आली आहेत. मात्र त्याच्या नोंदी दिसत नाहीत.