हिंगोलीत पोळा उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:31 AM2017-08-22T00:31:34+5:302017-08-22T00:31:34+5:30

शहरात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पोळा मारोती भागात झालेल्या या सोहळ्यासाठी शहरातील विविध भागातून आलेल्या बैलजोड्यांसह नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

Hingoli Pole Celebrations Celebrated | हिंगोलीत पोळा उत्साहात साजरा

हिंगोलीत पोळा उत्साहात साजरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरात पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. पोळा मारोती भागात झालेल्या या सोहळ्यासाठी शहरातील विविध भागातून आलेल्या बैलजोड्यांसह नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
शहरातील पोळा मारोती भागात पारंपरिक पद्धतीने तोरण बांधून पोळ्याला प्रारंभ झाला. दुपारी २ वाजेपासूनच मंदिर परिसरात बैलजोड्या जमायला प्रारंभ झाला होता. वाजत-गाजत आपल्या सर्जा-राजाच्या जोडीला या परिसरात आणत होते. आकर्षक झुलींसह बैलांना बाशिंग, वॉर्निश, गोंडे, कसाट्या आदी लावून मोठ्या प्रमाणात सजविलेले पहायला मिळाले. सायंकाळी चारच्या सुमारास मातंगवाड्यातून वाजात-गाजत तोरण आणले. गुलाल उधळला. मानकरी सुभाष बांगर यांच्या हस्ते तोरणाची पूजा करून पोळ्याला प्रारंभ झाला. त्यानंतर बैलांची विधिवत पूजा करण्यात आली. मंगलाष्टके व परात वाजल्यानंतर प्रदक्षिणा घालून पोळा फुटला. त्यानंतर घरोघरी सर्जा-राजाला पुरण पोळीचा घास भरविण्यात येत असल्याचे चित्र पहायला मिळत होते. जुन्या भागात पोळ्यानिमित्त एकमेकांच्या भेटी घेवून आशीर्वाद घेण्यासाठीही नागरिकांची गर्दी सायंकाळी उशिरापर्यंत पहायला मिळत होती.
पोळ्याच्या सणामुळे बाजारपेठेत मात्र शुकशुकाट होता. शहरातील विविध भागातून आलेल्या बैलजोड्या परततानाचे चित्र दिसून येत होते. हिंगोलीत पोळा सण अतिशय शांततेत व उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

Web Title: Hingoli Pole Celebrations Celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.