पाच मानकऱ्यांनाच परवानगी दिल्याने नाथवंशजाचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:04 AM2021-03-31T04:04:11+5:302021-03-31T04:04:11+5:30
तुकाराम बीजेपासून नाथांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरण्यास प्रारंभ करून नाथषष्ठीस औपचारिक प्रारंभ होत असतो. मंगळवारी कडक पोलीस बंदोबस्तात पाच ...
तुकाराम बीजेपासून नाथांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरण्यास प्रारंभ करून नाथषष्ठीस औपचारिक प्रारंभ होत असतो. मंगळवारी कडक पोलीस बंदोबस्तात पाच नाथवंशजांनी या रांजणाची पूजा केली. या पूजनाने नाथषष्ठी यात्रेस प्रारंभ झाला. ज्या भाविकाच्या घागरीने रांजण भरतो त्यास भगवान श्रीकृष्ण मानून सत्कार केला जातो, असा हा नाथषष्ठीतील पहिला उत्सव. यंदा नाथषष्ठी यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. २० मानकऱ्यांसह उत्सव साजरा करण्याची परवानगी शासनाने दिली होती. मात्र, मंगळवारी ऐन वेळेला पाच मानकरी घेऊन उत्सव साजरा करा, असा आदेश नाथवंशजांना देण्यात आला. त्यामुळे वारकरी व भाविकांसह नाथवंशजांचा मोठा हिरमोड झाला. नाथवंशज श्रीजेश गोसावी, विनीत गोसावी व ज्ञानराज गोसावी यांच्या हस्ते रांजण पूजा करण्यात आली. ऊर्वी योगिराज गोसावी हिच्या हस्ते रांजणात पाण्याची पहिली घागर टाकण्यात आली. त्यानंतर सुरश्री गोसावी हिने रांजणात घागर टाकून रांजण भरण्यास प्रारंभ केला.
नाथवंशज आज मांडणार आपली भूमिका
पाच मानकऱ्यांसह नाथषष्ठी उत्सव साजरा करणे शक्य नाही. राज्यातील अन्य देवस्थानांच्या पूजाविधी करण्यासाठी २० जणांना परवानगी आहे. परंतु नाथषष्ठीसाठी फक्त पाच जणांना परवानगी देण्यात आली आहे. पाच जणांत षष्ठीची पूजा विधी करणे शक्य नसल्याने आम्ही आमची भूमिका बुधवारी मांडणार असल्याचे नाथवंशज हरिपंडित गोसावी यांनी सांगितले.