लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केक कापला अन् जेलमध्ये गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:02 AM2021-05-03T04:02:07+5:302021-05-03T04:02:07+5:30
औरंगाबाद : तलवारीने केक कापून लग्नाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या नवरोबाला जेलची हवा खावी लागली. तलवारीने केक कापताना व्हॉट्सॲप ग्रुपवर ...
औरंगाबाद : तलवारीने केक कापून लग्नाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या नवरोबाला जेलची हवा खावी लागली. तलवारीने केक कापताना व्हॉट्सॲप ग्रुपवर नवरा- बायकोचा व्हिडीओ व्हायरल झाला. ते पाहून पुंडलीकनगर ठाण्याच्या पोलिसांनी विश्रांतीनगर येथे धाव घेऊन त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला रविवारी जामीन मंजूर न करता, जेलमध्ये पाठविण्याचे आदेश दिले.
दीपक जनार्दन सरकटे (२३, रा. विश्रांतीनगर, गारखेडा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दीपक हा फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करत असून, जालना येथील ट्रान्सपोर्टमार्फत त्याच्या दोन ट्रक चालतात. त्याची दोन घरे आहेत. पूर्वी तो विश्रांतीनगर येथे राहायचा. लॉकडाऊनपूर्वी त्याने राजनगर, मुकुंदवाडी परिसर येथेही घर घेतले असून, तेथे तो कुटुंबासोबत राहतो. त्याने राजनगर व विश्रांतीनगर येथे दोन्ही घरी १ मे रोजी रात्री लग्नाचा वाढदिवस साजरा केला.
शनिवारी रात्री त्याच्या व्हायरल व्हिडीओबाबत पोलिसांना माहिती समजताच, सहायक निरीक्षक घन:श्याम सोनवणे व पोलिस कर्मचाऱ्यांनी विश्रांतीनगर येथे सापळा लावून दीपक सरकटे यास ताब्यात घेतले. त्याला सदरील व्हिडीओ दाखवताच, त्याने घरात पलंगाखाली ठेवलेली तलवार पोलिसांना काढून दिली. शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. रविवारी त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, त्याची जामीन नामंजूर करण्यात आल्यामुळे त्याला हर्सूल तुरुंगात रवाना करण्यात आले.
चौकट....
स्वसंरक्षणासाठी नांदेडहून आणली तलवार
पोलिसांनी त्याच्याकडे तलवारीविषयी कसून चौकशी केली असता, त्याने सांगितले की, आपला जालना येथे ट्रकचा मालवाहतुकीचा व्यवसाय आहे. जालन्याहून रात्रबेरात्री येताना आपली लूटमार होऊ नये, म्हणून नांदेड येथून स्वसंरक्षणासाठी तलवार आणली होती. नवरा-बायकोने १ मे रोजी लग्नाच्या वाढदिवशी तलवारीने केप कापून त्याचा व्हिडीओ व्हायरल केला आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकला.