अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक ‘बारवे’चे पुनरुज्जीवन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 01:50 PM2018-05-07T13:50:49+5:302018-05-07T13:51:36+5:30

शहराजवळील सातारा गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवेच्या लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सातारा ग्रामस्थ आणि जलदूत सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि.६) सुरुवात झाली.

The historic 'Barav' built by AhilyaDevi Holkar will be revived | अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक ‘बारवे’चे पुनरुज्जीवन होणार

अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक ‘बारवे’चे पुनरुज्जीवन होणार

googlenewsNext

औरंगाबाद : शहराजवळील सातारा गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक बारवेच्या लोकसहभागातून पुनरुज्जीवन करण्याच्या कामाला सातारा ग्रामस्थ आणि जलदूत सामाजिक संस्थेतर्फे रविवारी (दि.६) सुरुवात झाली. या कामाचा शुभारंभ सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर डोरले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बांधकाम व्यावसायिक प्रमोद खैरनार, जलदूतचे अध्यक्ष किशोर शितोळे उपस्थित होते.

शहराजवळ असलेले ऐतिहासिक सातारा गाव महापालिकेच्या हद्दीत असतानाही पाण्याची कोणतीही व्यवस्था गावात नाही. यामुळे गावकऱ्यांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. या गावातच  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी खंडोबा मंदिर व बारवेचे बांधकाम केले होते. या बारवेला बारमाही पाणी असल्याचे वयोवृद्ध नागरिक सांगतात; मात्र या बारवेला झाडाझुडपांनी वेढले आहे.

 या बारवेत कचरा, माती टाकल्यामुळे जवळपास बुजून गेली होती. बारवेचे दगडी बांधकाम अनेक ठिकाणी बुजून गेले होते, तेव्हा जलदूत या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व पाणीतज्ज्ञ किशोर शितोळे यांनी सातारा गावातील युवकांना एकत्रित करून बारवेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्धार केला. यासाठी लोकसहभागातून निधी उभारण्याची मोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. गावकऱ्यांनी लोकवर्गणी जमा केली. यानुसार रविवारी सकाळी ९ वाजता बारवेच्या पुनरुज्जीवनाच्या कामाला मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली.

या कामाचा शुभारंभ प्राचार्य प्रभाकर डोरले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जलदूतचे किशोर शितोळे यांनी बारवेच्या पुनरुज्जीवन कामाचा तांत्रिक आराखडा गावकऱ्यांना समजावून सांगितला. यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अश्पाक पटेल, अजय चोपडे, लक्ष्मण सोलाटे, जनकल्याण समितीचे बाळकृष्ण खानविलकर, बाळू मिसाळ, प्रशांत बोठे, सोमीनाथ शिराने, दिलीप आरते, विवेक होणावणे, जलदूतचे प्रताप पाटील, विठ्ठल गायकवाड, चेतन पगारे, ज्ञानेश्वर बोरसे, सविता कुलकर्णी, सुधीर फुलवाडकर, रामेश्वर मोहिते, लक्ष्मण सोलाटे  आदी उपस्थित होते.

बारव ऐतिहासिक ठेवा
सातारा गावातील ऐतिहासिक बारवेच्या पुनरुज्जीवनाच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. बारवेचे पुनरुज्जीवन झाल्यास सातारावासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. या कामासाठी इतिहासप्रेमी, शहरातील नागरिकांनी पुढे यावे. सदर बारव आपला ऐतिहासिक ठेवा आहे. या कामातून तो जपण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे.
- किशोर शितोळे, जलदूत सामाजिक संस्था

Web Title: The historic 'Barav' built by AhilyaDevi Holkar will be revived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.