ऐतिहासिक ‘क्लॉक टॉवर’ला मिळाले गतवैभव; १२० वर्षांनंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने होतेय डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2021 04:44 PM2021-07-06T16:44:15+5:302021-07-06T16:54:25+5:30
The historic ‘Clock Tower’ in Aurangabad : या डागडुजीमुळे घडी घराचे आणखी ५० ते ७० वर्षांनी आयुष्य वाढले.
औरंगाबाद : जुन्या शहरात शहागंजस्थित ऐतिहासिक ‘घडी घर’ (क्लॉक टॉवर) मोडकळीस आले होते. १९०१ मध्ये घडी घरची उभारणी करण्यात आली होती. जवळपास सव्वाशे वर्षांत याकडे लक्षच देण्यात आले नव्हते. त्यामुळे तो मोडकळीस आला होता. ठिकठिकाणी पडझड सुरू झाली होती. स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिक कुमार पाण्डेय यांनी घडी घराला गतवैभव मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. तब्बल २९ लाख रुपये खर्च करून नूतनीकरणाचे काम आता पूर्ण होत आले आहे. विशेष बाब म्हणजे सव्वाशे वर्षांपूर्वी ज्या साहित्याचा वापर करून टॉवर उभारण्यात आले, त्याच साहित्याचा आजही वापर करण्यात आला.
स्मार्ट सिटीने घडी घराच्या नूतनीकरणासाठी अनेकदा निविदा काढली. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. कारण, डागडुजीसाठी टाकण्यात आलेले निकष अत्यंत कडक होते. किचकट काम करण्यास कंत्राटदार तयार नव्हते. शहरातील ऐतिहासिक दरवाजे, जुन्या इमारतींचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना विनंती करण्यात आली. काझी सिराजोद्दीन यांनी कामाची हमी भरली. घडी घराचे संपूर्ण प्लास्टर कोरून काढण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली. डागडुजीसाठी वापरण्यात येणारे साहित्य कोणते असावे, हे सांगण्यात आले. चुना, विटांचे पावडर, डिंंक, गूळ, वेलपत्ता, मेथी, भेंडी, सिरस आदी साहित्य वाटून घ्यायचे. त्याला महिनाभर भिजायला ठेवायचे. त्यानंतर सर्व साहित्य लोखंडी भांड्यात ठेवून त्याला जाळायचे आणि मगच त्याचा वापर करण्याची मुभा दिली. नौबत दरवाजा परिसरात कंत्राटदाराने साहित्य तयार करण्याची भट्टीच तयार केली. वर्षभरात हे काम हळूहळू करण्यात आले. संपूर्ण कामात सिमेंटचा वापर केलेला नाही. या डागडुजीमुळे घडी घराचे आणखी ५० ते ७० वर्षांनी आयुष्य वाढले. नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या रंगरंगोटी करण्यात येत आहे.
घडीघराचा इतिहास
निझाम राजवटीतील शेवटचे निझाम आसिफ जहाँ महेबूब अलीखान यांनी निझाम राजवटीला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहागंजच्या मशीदसमोर भव्य क्लॉक टॉवर बांधण्याचा निर्णय घेतला होता. ३ मे १९०१ रोजी टॉवरच्या बांधकामास सुरुवात झाली. ३० ऑक्टोबर १९०६ रोजी बांधकाम पूर्ण झाले. या टाॅवरचे वैशिष्ट्य म्हणजे घड्याळ दर तासाला घंटा वाजवत. घंट्याचे स्वर जुन्या औरंगाबाद शहराला त्यावेळी स्पष्टपणे ऐकू येत असे. रमजान महिन्यात सायरन वाजविण्याची परंपरा होती. टॉवरमधील घड्याळाचे दर तासाला वेळेप्रमाणे ठोके पडत असे. कालांतराने ही यंत्रणा बंद पडली. मनपा प्रशासनाने अनेकदा सायरन, घड्याळ दुरुस्त केली, पण त्याचा फारसा उपयोग होऊ शकला नाही.
अतिक्रमणांचा विळखा
शहागंजमधील क्लॉक टॉवर पर्यटकांसाठी आजही आकर्षणाचे केंद्र आहे. बाजारात फेरफटका मारणारे पर्यटक हमखास या भागात येतात. मात्र, परिसरात प्रचंड अतिक्रमणे झाली आहेत. पर्यटकांना क्षणभर थांबण्यासाठी जागा नाही. पर्यटकांना बसण्यासाठी तरी या भागात काही व्यवस्था करायला हवी.
-
-