स्मार्ट सिटीच्या चुकीच्या 'अंदाजा'मुळे ऐतिहासिक दरवाजा कोलमडतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 01:42 PM2021-07-13T13:42:20+5:302021-07-13T13:45:29+5:30

Mehmood Gate Collapse : शहरात बोटावर मोजण्याऐवढेच ऐतिहासिक दरवाजे आता शिल्लक राहिले आहेत.

The historic door is collapsing due to the wrong 'estimate' of the Aurangabad smart city | स्मार्ट सिटीच्या चुकीच्या 'अंदाजा'मुळे ऐतिहासिक दरवाजा कोलमडतोय

स्मार्ट सिटीच्या चुकीच्या 'अंदाजा'मुळे ऐतिहासिक दरवाजा कोलमडतोय

googlenewsNext
ठळक मुद्देदुरुस्तीसाठी अंदाजपत्रक कमी खर्चाचे कंत्राटदारांनी निविदाच भरली नाही

औरंगाबाद : स्मार्ट सिटीच्या निधीतून शहरातील ऐतिहासिक ९ दरवाजांची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. सर्वाधिक मोडकळीस आलेल्या महेमूद दरवाजाच्या कामासाठी केवळ ५६ लाखांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. वास्तविक पाहता खर्च १ कोटींच्या आसपास होता. भरीव आर्थिक तरतूद नसल्याने कंत्राटदारांनी या दरवाजाची निविदाच भरली नाही. उर्वरित आठ दरवाजांसाठी निविदा प्राप्तही झाल्या. आता काम संपत आले आहे. (The historic door is collapsing due to the wrong 'estimate' of the Aurangabad smart city ) 

शहरात बोटावर मोजण्याऐवढेच ऐतिहासिक दरवाजे आता शिल्लक राहिले आहेत. या दरवाजांना गतवैभव मिळवून देण्यासाठी मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी पुढाकार घेतला. २०१९ मध्ये निविदा प्रकिया राबविण्यात आली. फेरनिविदांमध्ये काही कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला. मात्र, पानचक्कीसमोरील मेहमूद दरवाजाची निविदा कोणीच भरली नाही. ५६ लाख रुपयांमध्ये डागडुजीचे काम अशक्यप्राय होते. त्यामुळे कंत्राटदारांनी निविदा भरली नाही. स्मार्ट सिटी प्रशासनाला कंत्राटदारांनी अंदाजपत्रात वाढीव तरतूद करावी, अशी सूचनाही केली. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मागील दीड वर्षांत महेमूद दरवाजाची अधिक वाताहत झाली. अनेक वाहनांनी दरवाजाला धडक दिली. आता दरवाजा मोडकळीस आला आहे.

दरवाजाचा ‘आर्च’निखळला.
कोणत्याही ऐतिहासिक दरवाजाचा ‘आर्च’ म्हणजेच कमान हा जीव असतो. आता हा आर्चच कोसळण्याच्या मार्गावर असल्याने दरवाजाची डागडुजी अशक्य असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. १ कोटींपेक्षा अधिक रक्कम डागडुजीसाठी लागेल. दरवाजाचे निखळणारे दगड नंबर टाकून बाजुला करावे लागतील. झिजलेले दगड बदलावे लागणार आहेत. ४०० वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने साहित्य कालवून काम केले जात होते तसेच काम करावे लागेल.

अजूनही दुरूस्ती शक्य
आर्च मोडकळीस आला तरी दुरूस्ती शक्य आहे. दरवाजांच्या दोन दगडांना जोडणारे काही दगड असतात. एक दगड दुसऱ्याला लॉकिंग करतो. पृष्ठभागावर एक मोठा दगड असतो. तो इतर दगडांना जोडून ठेवण्याचे काम करतो. दरवाजा पडला तरी दुरूस्ती शास्त्रोक्त पद्धतीने करता येऊ शकते.
- मोहमद युनूस, आर्किटेक्ट

स्मार्ट सिटीतून या दरवाजांची कामे :
दरवाजा - अंदाजपत्रकीय रक्कम
जाफरगेट - १७ लाख
बारापुल्लागेट - ७३ लाख ५० हजार
कटकटगेट - ४९ लाख २२ हजार
महेमूद गेट - ५६ लाख ३१ हजार
नौबत गेट - १७ लाख १९ हजार
पैठणगेट - २४ लाख ८५ हजार
रोशनगेट - ३१ लाख ४१ हजार
काळा दरवाजा - ३५ लाख ५४ हजार
खिजरी दरवाजा - १५ लाख ४८ हजार

Web Title: The historic door is collapsing due to the wrong 'estimate' of the Aurangabad smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.