औरंगाबादमधील ऐतिहासिक इमारतींना आता ‘क्यूआर कोड’; पर्यटकांना मिळणार सहज माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 06:49 PM2023-01-10T18:49:20+5:302023-01-10T18:50:38+5:30
या प्रयोगामुळे संबंधित फलकावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर त्या वास्तूची माहिती पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होईल.
औरंगाबाद : जी-२० परिषदेच्या निमित्ताने शहरातील सर्व ऐतिहासिक इमारतींची माहिती देण्यासाठी ‘क्यूआर कोड’ (क्विक रिस्पॉन्स कोड) तयार करण्याचे निर्देश सोमवारी मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी अधिकाऱ्यांना दिले; तसेच जी-२० परिषदेच्या वातावरण निर्मितीसाठी शाळांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याची सूचनाही त्यांनी केली.
स्मार्ट सिटी कार्यालयात जी-२० परिषदेच्या अनुषंगाने सोमवारी सायंकाळी प्रशासक डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ब्रॅण्डिंग समितीची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी शहरातील सर्व ऐतिहासिक इमारतींची माहिती ‘क्यूआर कोड’मध्ये उपलब्ध करून त्या इमारतींसमोर त्याचे फलक लावण्याचे निर्देश दिले. या प्रयोगामुळे संबंधित फलकावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर त्या वास्तूची माहिती पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होईल.
जी-२० परिषदेसाठी वातावरण निर्मिती करण्याकरिता शाळेतील चित्रकला स्पर्धांचे आयोजन करणे; तसेच जी-२० परिषद नेमकी काय आहे? याची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय परिषदेत सहभागी होणारे सर्व २० देशांचे ध्वज शहरात लावण्याचे नियोजन करण्यासंदर्भातही त्यांनी सूचित केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार, स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांची उपस्थिती होती.
किलेअर्क बौद्ध विहाराची पाहणी
किलेअर्क येथील करुणा बौद्ध विहार व सुधाकरराव भुईगळ सामाजिक सभागृहाचे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगाने प्रशासकांनी सोमवारी स्थळ पाहणी केली. या नूतनीकरणाच्या कामात सामाजिक सभागृहाच्या इमारतीच्या उजव्या कोपऱ्यावरील मुख्य दरवाजा स्थलांतरित करून तो सभागृहाच्या मध्यभागी बसविणे, सभागृहाच्या समोरील भिंतीची एलिव्हेशन ट्रिटमेंट बदलणे या कामांचा समावेश होता. याबाबत प्रशासकांनी मुख्यद्वार स्थलांतरित करण्याची मंजुरी दिली; तसेच सभागृहात स्वच्छतागृह बांधणे आणि छताची वॉटरप्रुफिंग करण्याचेही त्यांनी सूचित केले. यावेळी शहर अभियंता ए. बी. देशमुख, वॉर्ड अभियंता के. एम. काटकर, कनिष्ठ अभियंता कुलकर्णी यांची उपस्थिती होती.