ऐतिहासिक वारसा पुन्हा होतोय जिवंत; 'दख्खन का ताज' च्या ढासळलेल्या भागाचे संवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 06:31 PM2022-12-27T18:31:20+5:302022-12-27T18:32:14+5:30
जागतिक वारसा सप्ताह सुरू असतानाच नोव्हेंबरमध्ये बीबी का मकबऱ्याचा कोपरा ढासळल्याची घटना घडली होती.
औरंगाबाद : दख्खन का ताज म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या बीबी का मकबऱ्याचा ढासळलेला भाग पुन्हा एकदा साकारण्यात आला आहे. मकबऱ्याच्या संवर्धनाचे काम हाती घेतले असून, रचनेबरोबर नक्षीकामही पूर्वीप्रमाणेच ऐतिहासिक वाटेल, यासाठी कारागिरांचे हात झटत आहेत.
जागतिक वारसा सप्ताह सुरू असतानाच नोव्हेंबरमध्ये बीबी का मकबऱ्याचा कोपरा ढासळल्याची घटना घडली होती. पावसामुळे मकबऱ्याचा काही भाग कमकुवत होत असल्याची चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे संवर्धनाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. परंतु, ढासळलेल्या कोपऱ्याच्या परिस्थितीवरून प्रत्यक्षात तसे होत नसल्याची ओरड इतिहासप्रेमींमधून झाली. याविषयी ‘लोकमत’ने २२ नोव्हेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. अखेर ढासळलेल्या भाग पुन्हा एकदा साकारण्याचे काम हाती घेण्यात आले. ऐतिहासिक वारसा जसा आहे; तसेच स्वरूप पडझड झालेल्या भागाला देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वेरूळ लेणीत २० वर्षांनंतर रस्त्यांचे काम
वेरूळ लेणी परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे. तब्बल २० वर्षांनंतर या रस्त्यांचे डांबरीकरण हाती घेण्यात आले आहे. संरक्षित क्षेत्राच्या आतील रस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल. त्याबरोबरच लेणी क्रमांक १७ ते ते २७ पर्यंतच्या सध्याच्या पाथवेची किरकोळ डागडुजी करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे.