छत्रपती संभाजीनगरात ‘हिट ॲण्ड रन’; मद्यपी कारचालकाने सहा गाड्यांना उडविले, महिला गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:45 AM2024-09-23T11:45:29+5:302024-09-23T11:46:22+5:30
गाडीत आढळल्या दारूच्या बॉटल्स; कारचालक आणि त्याच्यासोबतचा एकजण फरार
छत्रपती संभाजीनगर : सेव्हन हिल उड्डाणपुलाकडून क्रांती चौकाकडे जाणाऱ्या मद्यधुंद कारचालकाने (एमएच ०२ बीएम ६२९६) आकाशवाणी चौक परिसरातील सहा गाड्यांना उडविल्याचा प्रकार रविवारी रात्री आठच्या सुमारास घडला. त्यात दुचाकीवरील एका सेवानिवृत्त महिला मुख्याध्यापिका गंभीर जखमी झाल्या. मद्यपी चालकाने आकाशवाणीच्या पाठीमागील गल्लीत कार थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. या प्रकरणी रिक्षाचालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती जवाहरनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन हिल उड्डाणपुलावरून काळ्या रंगाची फोर्ड कंपनीची एका आलिशान कार भरधाव वेगात आली. त्याच वेळी जालना रोडवरून नातेवाइकांना भेटण्यासाठी निघालेल्या जि.प.च्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका छाया पळसकर (६०, रा. गुलमोहर कॉलनी) यांच्या दुचाकीला (एमएच २० डीएल ५२०५) कारने पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात पळसकर गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या रिक्षाला (एमएच २० ईके ३५९५) पाठीमागून जोराची धडक दिली. तेथून पुढे आल्यानंतर आणखी चार वाहनांना धडक देऊन कार वेगात आकाशवाणी चौकात आली. त्या ठिकाणी कारचे पुढील टायर फुटले. तेव्हा वाहतूक पोलिसांनी कार अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चालकाने त्यांना हुलकावणी देत कार फ्रीडम टॉवरच्या रस्त्याकडे वळवली. फ्रीडम टॉवरच्या समोरच्या आणि आकाशवाणीच्या पाठीमागच्या रस्त्याने कार वेगात गेली. सिंधी कॉलनीत गेल्यानंतर अंधाराचा फायदा घेत कार रस्त्यावर सोडून चालकासह गाडीतील दुसरा व्यक्ती पळून गेली.
अंधाराचा फायदा घेऊन काढला पळ
या कारचा दोन दुचाकीस्वारांनी पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चालकासह सोबतची व्यक्ती फरार झाली. त्यानंतर पोलिसांनी घटना कळविण्यात आली. तेव्हा जवाहरनगर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कार टोइंग करून ठाण्यात आणली.
कारमध्ये सापडल्या दारूच्या बाटल्या
कारच्या पाठीमागील सीटवर महागड्या ब्रँडच्या दारूच्या बॉटल्या, पिण्यासाठीचे मग आढळून आले. डिक्कीतही दारू ठेवलेली होती. हा सर्व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्याच वेळी उडविलेल्या वाहनांपैकी दुचाकी, रिक्षाही ठाण्यात आणली. रिक्षाचालकाच्या फिर्यादीवरून फरार कारचालकावर गुन्हा नोंदविला. कारचालकाचा पोलिस शोध घेत आहेत.
मुंबईतील उमेश वलाप्पीलच्या नावावर कारची नोंदणी
सहा गाड्या उडविलेली फोर्ड कंपनीची अलिशान कार पश्चिम मुंबई आरटीओ कार्यालयात नोंदणीकृत असून, तिचा मालक उमेश वल्लाप्पील हे आहेत. गाडीच्या मालकाशी शहर पोलिस संपर्क साधत असून, रात्री उशिरापर्यंत संपर्क होऊ शकला नव्हता.