परतीच्या पावसाचा फटका; दसऱ्यात शंभराने विकलेला झेंडू दिवाळीत २५ रुपयांत
By प्रशांत तेलवाडकर | Published: October 24, 2022 01:09 PM2022-10-24T13:09:50+5:302022-10-24T13:10:54+5:30
ओलसर आणि खराब फुलांची मोठी आवक बाजारपेठेत झाली आहे
औरंगाबाद : अवघ्या १८ दिवसांपूर्वी विजयादशमीच्या दिवशी ७० ते १०० रुपये किलोने विकलेला झेंडू रविवारी चक्क २५ ते ३० रुपये किलो अशा मातीमोल भावात विकला जात होता. परतीच्या पावसाचा फटका बसलेला ओलसर व खराब झेंडू मोठ्या प्रमाणात बाजारात आला. त्यामुळे भाव गडगडले.
जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव रोड, सिटी चौकातील फूलबाजार, शहागंज, बीड बायपास, शिवाजीनगर, गजानन मंदिर ते शिवाजीनगर रोड या भागात ठिकठिकाणी विक्रेते झेंडू विक्रीला बसले होते. २५ ते ३० रुपये भाव होता. यात ओलसर व काळे डाग पडलेल्या फुलांची संख्या जास्त होती. सिटी चौकातील फूल बाजारात मात्र अन्य फुलांचे भाव वधारले होते. शेवंती ८० ते २०० रुपये किलो, निशिगंध २०० ते २५० रुपये, काकडा ८०० ते १ हजार रुपये तर गुलाब ३०० ते ४०० रुपये किलो होता. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड केली होती. मात्र, पावसाने त्यावर पाणी फेरले. पण ज्यांनी अन्य फुलांच्या लागवडीवर भर दिला, ते तरले. स्वस्त असल्याने अनेकांनी दोन ते तीन किलो झेंडू खरेदी केला. लक्ष्मीपूजनाला नगरहून झेंडू आला तर आणखी भाव कमी होतील.
बंगळुरू, उज्जैनहून आले कमळ
लक्ष्मीला कमळाचे फूल प्रिय आहे. त्यामुळे महालक्ष्मी पूजनासाठी आवर्जून कमळाचे फूल खरेदी केले जाते. दरवर्षी दिवाळीत कमळाची आवक कमी होत असते. यामुळे ५० ते १०० रुपयांत एक फूल विकले जाते. पण यंदा मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने अवघ्या १० रुपयांना मिळत होते.