परवानगी घेऊनच होर्डिंग लावता येतील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:04 AM2021-08-19T04:04:56+5:302021-08-19T04:04:56+5:30
औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. जिथे जागा दिसेल तेथे राजकीय पक्ष, संघटनांकडून होर्डिंग लावण्यात ...
औरंगाबाद : शहरात पुन्हा एकदा अनधिकृत होर्डिंगचे पेव फुटले आहे. जिथे जागा दिसेल तेथे राजकीय पक्ष, संघटनांकडून होर्डिंग लावण्यात येत आहेत. मागील आठ दिवसांमध्ये प्रशासनाने जवळपास एक हजार होर्डिंग काढले. आणखी ३ ते ४ हजार होर्डिंग वेगवेगळ्या भागांत झळकत आहेत. दुभाजकात उभारण्यात आलेल्या पोलवरही अनधिकृत होर्डिंग झळकत असल्याने परवानगी घेऊनच होर्डिंग लावावेत, असे आवाहन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे.
अनधिकृत होर्डिंग शहर विद्रुपीकरणात भर घालत आहेत. यापूर्वी खंडपीठाने महापालिकेला अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेची परवानगी घेऊन २ ते ३ टक्के होर्डिंग लागतात. ९५ ते ९७ टक्के फलक अनधिकृतपणे लावले जात आहेत. यामुळे महापालिकेला आर्थिक तोटाही सहन करावा लागतोय. शहरात वेगवेगळ्या भागात होर्डिंग लावण्यासाठी महापालिकेने खाजगी संस्थासुद्धा नेमल्या आहेत. महापालिकेच्या मालकीचेही काही होर्डिंग आहेत. मात्र, परवानगी घेण्यासाठी मनपाकडे कोणीच येत नाही. तीन दिवसांपूर्वी जालना रोडवरील तब्बल ८०० होर्डिंग महापालिकेने काढले होते. त्यापूर्वी २०० होर्डिंग काढण्यात आले होते. अलीकडे महापालिकेने दुभाजकाच्या मध्यभागी जाहिरातीसाठी बोर्ड उभारले आहेत. त्यावरही अनधिकृत होर्डिंग झळकत असल्याचे समोर आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असून, जाहिरात लावणाऱ्यांनी संबंधित एजन्सी किंवा मनपाकडून रीतसर परवानगी घ्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.