प्रशासकांच्या आदेशानंतरही होर्डिंग उभारणी सुरूच; मुख्य रस्त्यांवर पसरतोय अंधार, प्रशासन गप्प

By मुजीब देवणीकर | Published: February 15, 2024 11:09 AM2024-02-15T11:09:53+5:302024-02-15T11:10:02+5:30

जालना रोडवर उभारण्यात आलेल्या होर्डिंगमुळे एका बाजूला रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे.

Hoardings continue to be erected despite administrators' orders; Darkness is spreading on the main roads, the administration is silent | प्रशासकांच्या आदेशानंतरही होर्डिंग उभारणी सुरूच; मुख्य रस्त्यांवर पसरतोय अंधार, प्रशासन गप्प

प्रशासकांच्या आदेशानंतरही होर्डिंग उभारणी सुरूच; मुख्य रस्त्यांवर पसरतोय अंधार, प्रशासन गप्प

छत्रपती संभाजीनगर : सिडको उड्डाणपुलाजवळ दुभाजकात होर्डिंग उभारणीसाठी केलेल्या खड्ड्यामुळे गॅस गळतीची घटना १ फेब्रुवारीला घडली. या घटनेनंतर प्रशासक जी. श्रीकांत यांनी होर्डिंग उभारणीस ‘ब्रेक’ लावला होता. प्रशासकांच्या आदेशानंतरही जालना रोडसह मुख्य रस्त्यांवर युद्धपातळीवर होर्डिंग उभारणी सुरूच आहे. विशेष बाब म्हणजे प्रत्येक होर्डिंग मनपाच्या पथदिव्यांसमोर लावल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरू लागले. त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत बसथांबे उभारण्याचे काम एका खासगी एजन्सीला दिले. या एजन्सीने बसथांब्यांवर जाहिराती लावून बसथांब्याचा खर्च काढून घ्यावा, असे ठरले. कंपनीने १५० पैकी १२० बस थांबे उभारले. त्यानंतर एजन्सीला स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बसथांब्याच्या बाजूला होर्डिंग उभारण्याची परवानगी घेतल्याची चर्चा आहे. यापुढे जाऊन एजन्सीने मुख्य रस्त्यांवरील दुभाजकात मोठे होर्डिंग उभारण्याची परवानगी मिळवली. मुळात स्मार्ट सिटीला अशा पद्धतीचे काम काम मनपाला न विचारता देण्याचे अधिकार आहेत का? हे सर्व काही करीत असताना मनपाच्या मालमत्ता विभागाची साधी एनओसी घेतली नाही. वाहतूक पाेलिसांनाही कळविले नाही.

गॅस गळतीच्या घटनेनंतर एजन्सीच्या कामाचे बिंग फुटले. प्रशासक जी. श्रीकांत यांन त्वरित काम थांबविण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी एजन्सीने फाऊंडेशन उभारले होते, तेथे मागील आठ दिवसांत रात्रीतून मोठे होर्डिंग लावून टाकले. यामुळे नागरिकही चकीत झाले.

वाहतुकीचा प्रश्नही गंभीर
होर्डिंग उभारताना रस्त्यापासून त्याची उंची किती असावी, या निकषांचा विचारच झालेला नाही. हिमायतबाग उद्धवराव पाटील चौकातील होर्डिंगमध्ये उंच कापसाचा ट्रकही अडकून अपघात होऊ शकतो, एवढी कमी उंची आहे.

दिव्याखाली अंधार
स्मार्ट सिटीच्या एजन्सीने जालना रोडसह मुख्य ठिकाणी होर्डिंग उभारले, तेथे मनपाच्या पथदिव्यांचा प्रकाश जाहिरातींवर फुकटात पडेल, अशी सोय केली. विरुद्ध बाजूला विशाल होर्डिंगमुळे अंधाराचे साम्राज्य पसरत आहे, याचा विचारच एजन्सीने केलेला नाही.

अंधाराच्या ठिकाणी लाईट लावावा
स्मार्ट सिटीच्या होर्डिंगमुळे मुख्य रस्त्यांवर अंधार पडत असेल तर संबंधित एजन्सीने वीज कनेक्शन घेऊन दुसऱ्या बाजूलाही लाईट लावायला हवेत.
- ए.बी. देशमुख, शहर अभियंता.

Web Title: Hoardings continue to be erected despite administrators' orders; Darkness is spreading on the main roads, the administration is silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.