राकाँचे माजलगाव तहसीलसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 11:35 PM2017-04-18T23:35:43+5:302017-04-18T23:37:25+5:30
माजलगाव : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.
माजलगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत येथील तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मंगळवारी सकाळी ११ वा. माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
२०१४ विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अडीच वर्षे होऊनही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केलेला नाही. यामुळे विरोधकांना संघर्ष यात्रा काढावी लागली. या संघर्ष यात्रेला पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी दुष्काळी अनुदान, रबी पीक विमा, निराधार योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान या व इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी येथील तहसीलदार एन.जी. झंपलवाड यांना काहीकाळ चांगलेच धारेवर धरले. या आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादीचे जयसिंग सोळंके, अशोक डक, दीपक जाधव, जयदत्त नरवडे, सुशील सोळंके, कचरु खळगे, डॉ. वसीम मनसबदार, दयानंद स्वामी, चंद्रकांत शेजूळ, कल्याण आबूज, प्रकाश गवते, भीमकराव हाडुळे, भारत आलझेंडे, शेख मंजूर, नवाब पटेल आदी नेते मंडळीसह शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सामील झाले होते. (वार्ताहर)