प्रदीप जैस्वालांच्या गळ्यातील भगवे उपरणे धरून रावसाहेब दानवे म्हणाले, ‘हा आमचाच पक्ष’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 03:07 PM2023-02-20T15:07:46+5:302023-02-20T15:09:52+5:30
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आ. प्रदीप जैस्वाल यांच्या गळ्यातील भगवे उपरणे धरून ‘हा आमचाच पक्ष’ म्हटल्याने चर्चेला उधान
औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शनिवारी विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्यापूर्वी आ. प्रदीप जैस्वाल यांच्या गळ्यातील भगवे उपरणे धरून ‘हा आमचाच पक्ष आहे’, असे म्हटले. त्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावरून राजकीय परिस्थितीवर चांगलीच चर्चा रंगली. शिवाय विशेष रेल्वे रवाना होताना नेत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये साजरी होत असून, त्यासाठी जाणाऱ्या शिवप्रेमींसाठी शनिवारी विशेष रेल्वे सोडण्यात आली. यावेळी रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या सोहळ्याच्या दृष्टीने आवश्यक परवानगी भाजपमुळेच मिळू शकली, अशी चर्चा सुरू असल्याविषयी माध्यमांनी त्यांना विचारणा केली. दानवे यांनी ‘हे शिवप्रेमी असून, कोण्या पक्षाचे नाही’, असे म्हटले. यावेळी सोबत उभे असलेल्या आ. सतीश चव्हाण यांच्याकडे हात दाखवित ‘हे व आम्ही दोन पक्षांचे आहोत’ असेही ते म्हणाले. त्यावर आ. चव्हाण यांनी तिसरा पक्षही आहे, असे म्हणत आ. प्रदीप जैस्वाल यांच्याकडे निर्देश केला. तेव्हा दानवे यांनी आ. जैस्वाल यांच्या गळ्यातील भगवे उपरणे हातात धरून ‘हा आमचाच पक्ष आहे...’ असे म्हटले. त्यावर उपस्थित प्रत्येक जण खळखळून हसला.
तुमच्यानंतर मी नाही बोलणार...
रावसाहेब दानवे यांनी आ. चव्हाण यांना उपस्थितांशी बोलण्यास सांगितले; परंतु, तुम्ही बाेलले, त्यावर मी नाही बोलणार, असे आ. चव्हाण म्हणाले. नव्या रेल्वेला झेंडा दाखविताना रेल्वे प्रशासनाकडून ठरावीक आकाराच्या झेंड्याचा वापर केला जातो. या रेल्वेला रवाना करण्यासाठी काहींनी वेगळ्याच आकारातील झेंडे आणले होते; परंतु, ते झेंडे टाळत रेल्वे प्रशासनाच्याच झेंड्यांचा वापर करण्यात आला.