होळी, पाडव्यासाठी गाठी बनविण्याची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:04 AM2021-03-22T04:04:56+5:302021-03-22T04:04:56+5:30
विहामांडवा : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीच्या सणावर कोरोनाचे सावट या वर्षीदेखील आल्याने होळीचे रंग फिके होणार आहेत. ग्रामीण ...
विहामांडवा : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळीच्या सणावर कोरोनाचे सावट या वर्षीदेखील आल्याने होळीचे रंग फिके होणार आहेत. ग्रामीण भागात सर्वांत मोठा ओळखला जाणारा होळीचा सण तोंडावर आला आहे, तरी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता यंदाही होळीच्या सणावर मर्यादा येणार आहेत. मात्र, पिढ्यानपिढ्या पैठण तालुक्यातील विहामांडवा गावातील कैलास गंगथिरे, संदीप गंगथिरे यांच्या कुटुंबाकडून हार-कडे बनविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच चविष्ट गाठी तयार करण्यासाठी विहामांडवा येथील भोई समाजाची अनेक कुटुंबे परिसरात प्रसिद्ध आहेत. गेल्या चार पिढ्यांचा हा उद्योग अनेकांनी आजही तितक्याच समर्थपणे यशस्वीरीत्या पुढे चालू ठेवला आहे. साखरगाठीची रेसीपी साधारण वाटत असली तरी यामागे मोठे कष्ट असतात. त्यामुळे सर्व कुटुंब या दिवसात भल्या पहाटे उठून या कामाला लागतात. गुढीपाडव्याला साखर गाठींना धार्मिक महत्त्व येत आहे. ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेला हा उद्योग आजच्या मार्केटिंगच्या काळातही धडपडत का होईना शाबूत असल्याने काही कुटुंबांना वर्षातून एका महिन्याचा हा चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेला हा उद्योग आजच्या मार्केटिंगच्या काळातही धरपडत का होईना टिकून आहे. काही कुटुंबांना वर्षातून एका महिन्याचा चांगला रोजगार उपलब्ध होतोे. मात्र, आज मोठ्या व्यवसायाच्या स्पर्धेत ही खानावळीची परंपरा किती शाबूत राहील, हा एक प्रश्नच आहे. होळी सण जसा जवळ येत आहे. तसा बच्चे कंपनीमध्ये आनंदाचे वातावरण असते. यंदा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने रंगपंचमीच्या सणाचा बालकांमध्ये हिरमोड झाला आहे.
अशा तयार होतात साखरगाठी
एका कढईला उष्णता देऊन यात गरजेनुसार पाणी आणि साखर टाकली जाते. नंतर दूध टाकून ते अधिक शुभ्र आणि चवदार होईल याची काळजी घेतली जाते. चाचणी देऊन या साखरेचे पाणी एका लाकडी साचात दोरे टाकून भरले जाते. काही वेळाने ते थंड झाले की हे लाकडी साचे वेगळे काढले जातात. मग यातून तयार होतो. तो साखरेचा पांढरा शुभ्रहार. रंगीबेरंगी गाठीसाठीही कलर टाकून आकर्षक गाठी बनविल्या जातात.
------
फोटो : पैठण तालुक्यातील विहामांडवा गावात साखरेच्या गाठी बनवण्याची लबगब दिसून येत आहे.
(छाया : शेख आरेफ, विहामांडवा)