कृषी कायद्यास स्थगिती देणाऱ्या अध्यादेशाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 01:08 PM2020-10-08T13:08:04+5:302020-10-08T13:10:54+5:30
केंद्र शासनाने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत शासनाने कृषी विधेयकाच्या स्थगितीसाठी काढलेल्या अध्यादेशाची होळी केली.
औरंगाबाद : केंद्र शासनाने संसदेत पारित केलेल्या कृषी विधेयकाला राज्यातील महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत शासनाने कृषी विधेयकाच्या स्थगितीसाठी काढलेल्या अध्यादेशाची होळी केली.
कृषी विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून ते राज्यात लागू करण्याची मागणी करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बोलताना आ. हरिभाऊ बागडे म्हणाले की, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारने गेल्या ६ वर्षांत अनेक निर्णय घेतले आहेत. डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. युपीए सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आमलात आणण्याची इच्छाशक्ती कधीच दाखविली नाही. कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. मात्र राजकीय हेतूने त्यास राज्य शासनाने विरोध केला आहे, असा आरोप बागडे यांनी केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, सरचिटणीस लक्ष्मण औटे, अशोक पवार, सूरज लोळगे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.