सुट्टीच्या दिवशी शस्त्रक्रिया शिबीर; मोतीबिंदूचे विसर्जन, डोळ्यातील अंधार झाला दूर
By संतोष हिरेमठ | Published: September 10, 2022 05:45 PM2022-09-10T17:45:09+5:302022-09-10T17:46:04+5:30
सिल्लोड येथून आलेल्या ३१ रुग्णांची शस्त्रक्रिया झाली.
औरंगाबाद : गणेश विसर्जनानिमित्त सुटी असतानाही शुक्रवारी आमखास मैदानासमोरील जिल्हा नेत्र विभागात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून मोतीबिंदूचे विसर्जन झाले आणि ३१ जणांना दृष्टी मिळाली.
जिल्हा नेत्र विभागात शुक्रवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी गणपती विसर्जन होते. याच दिवशी सिल्लोड येथून आलेल्या ३१ रुग्णांची शस्त्रक्रिया झाली. त्यांच्या मोतीबिंदूचे विसर्जन करण्यात आले. खऱ्या अर्थाने त्यांना गणपती पावला. हे सर्व ३१ रुग्ण आता सगळ्या सृष्टीचे दर्शन घेऊ शकतील.
जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संतोष काळे , नोडल ऑफिसर डाॅ. महेश वैष्णव, भुलतज्ज्ञ डॉ. साजिद शेख, डॉ. विभा भिवटे, डॉ. चाटे, नेत्र चिकित्सा अधिकारी पोळ, देशमुख, सोनटक्के, साकीब खान, साळवे, तसेच इन्चार्ज सिस्टर डोईफोडे, कवडीकर, पवार, नाईक, सोनवणे, तुपे, चंद्रकला, विमल आदींनी यासाठी प्रयत्न केले. सुट्टी असताना सर्वांनी रुग्णसेवा दिल्याने रुग्णांनीही कृतज्ञता व्यक्त केली.