सुटी संपली, शाळा गजबजल्या...किलबिलाट सुरू
By Admin | Published: June 15, 2016 11:58 PM2016-06-15T23:58:06+5:302016-06-16T00:15:15+5:30
औरंगाबाद : उठा उठा, सकाळ झाली.... शाळेला जायची वेळ झाली.... अशा प्रकारचे वाक्य घराघरातल्या आईच्या तोंडातून निघत होते.
औरंगाबाद : उठा उठा, सकाळ झाली.... शाळेला जायची वेळ झाली.... अशा प्रकारचे वाक्य घराघरातल्या आईच्या तोंडातून निघत होते. दोन ते अडीच महिन्यांची मोठी सुटी संपून मुलांच्या शाळांना सुरुवात होणारा हा दिवस.. त्यामुळे जेवढा उत्साह मुलांना, तेवढाच त्यांच्या आयांनाही होता.
सकाळी सकाळीच चिमुकल्यांची लगबग अनेक घरांमध्ये दिसून आली. शाळेचा नवा-कोरा गणवेश, खोक्यातून नुकतेच बाहेर काढलेले शाळेचे बूट आणि सॉक्स, नव्या दप्तराचा वेगळाच येणारा सुगंध, पुस्तक- वह्यांचा तो कोरा करकरीतपणा, यंदा पहिल्यांदाच घेतलेला शाईचा पेन, डबा, वॉटरबॅग अशा विविध प्रकारच्या वस्तू मुलांना शाळेला जाण्यासाठी नवा आनंद देत होत्या. वेळेच्या आधीच प्रत्येक शाळा चिमुकल्यांच्या किलबिलाटाने फुलून गेली होती.
प्रत्येकाजवळच सांगण्यासारखे खूप होते. काही जणांनी तर अनेक दिवसांनी भेटलेल्या आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींची चक्क गळाभेट घेऊन आनंद व्यक्त केला. प्रत्येकालाच आपल्या वर्गमित्रांना भेटून सुटीत केलेल्या धमाल गोष्टी सांगायच्या होत्या. मित्रांनी सुटीत काय अनुभवले, ते ऐकायचे होते आणि पुन्हा एकदा आपल्या वर्गमित्रांसोबत आपल्या वर्गात बसून शिकण्याचा आनंद घ्यायचा होता. शाळादेखील जणू याच क्षणाची वाट पाहत होती. पहिला दिवस असल्यामुळे शिक्षकवृंदांचा आनंदही ओसंडून वाहत होता.