खाल्ला मार; तरीही गपगार
By Admin | Published: November 10, 2014 11:33 PM2014-11-10T23:33:17+5:302014-11-10T23:59:07+5:30
धारूर : येथील भारतीय स्टेट बँकेच्या एका कर्मचाऱ्याला रविवारी मारहाण झाली. त्याचे पडसाद सोमवारी उमटले. बँकेचा व्यवहार दिवसभर ठप्प होता.
धारूर : येथील भारतीय स्टेट बँकेच्या एका कर्मचाऱ्याला रविवारी मारहाण झाली. त्याचे पडसाद सोमवारी उमटले. बँकेचा व्यवहार दिवसभर ठप्प होता. मात्र मारहाणीबाबत ना मार खाणारा कर्मचारी बोलायला तयार आहे ना अधिकारी पोलिसात तक्रार देण्यास धजावत आहेत. त्यामुळे मारहाणीचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. रविवारी आॅडिटचे काम सुरू असल्याने बँक सुरू होती. दुपारी बँकेतील एका कर्मचाऱ्याला बँकेजवळच अज्ञात तीन ते चार लोकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर इतर कर्मचारी त्याला सोडविण्यासाठी गेले तेव्हा त्यांनाही हल्लेखोरांनी दम भरला. मारहाणीचे हे प्रकरण नेमके कशामुळे घडले हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र हा संपूर्ण प्रकार दडविण्याचा मात्र सोयीस्कर प्रयत्न सुरू आहे.
सोमवारी सकाळी बँक नित्याप्रमाणे सुरू झाली खरी परंतु सर्वांच्या चेहऱ्यावर तणाव होता. कोणी काहीच बोलण्यास तयार नव्हते. महत्वाचे म्हणजे कामकाजही बंद ठेवण्यात आले. रविवारची सुटी असल्याने सोमवारी बँकेत गर्दी होती. मात्र ग्राहकांना आल्या पावली परत जावे लागत होते. बँकेचे व्यवहार कशामुळे ठप्प आहेत याचे उत्तरही अधिकारी देत नव्हते. दरम्यान, बँकेने सोमवारी शहरातील एटीएममध्ये पैशांचा भरणा केला नाही त्यामुळे शेकडो ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. मारहाणी मागचे कारण गुलदस्त्यात असून उलटसुलट चर्चेचे पेव फुटले आहे.
बँकेचे शाखाधिकारी एच. आर. कदम यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या सर्व प्रकाराला दुजोरा दिला. मात्र कर्मचाऱ्याची तक्रार नसल्याचेही सांगितले.
धारूर ठाण्याचे सहायक निरीक्षक रवी सानप म्हणाले, आमच्याकडे अद्याप तक्रार आलेली नाही. संबंधित कर्मचाऱ्याशी आम्ही संपर्कही साधला होता त्याने आपली तक्रार नसल्याचे सांगितल्याने आम्हाला काहीच करता येऊ शकत नाही.
दरम्यान, बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेऊन धारूरमध्ये बँकेची पाहणी केली. (वार्ताहर)