पुण्यदान, अस्थिविसर्जनातील पैसे-दागिने हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 08:26 PM2019-03-11T20:26:11+5:302019-03-11T20:29:38+5:30
ही माणसं दिवसभर पाण्यात राहून आपला उदरनिर्वाह चालवितात.
- तारेख शेख
कायगाव : औरंगाबाद- अहमदनगर राष्ट्रीय मार्गावरून जाताना जुने कायगाव येथे गोदावरी नदीच्या पुलावरून जाताना नेहमीच नदीपात्रात वीस-पंचवीस महिला-पुरुष मंडळी काहीतरी शोधताना नजरेस पडतात. सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही मंडळी नदीपात्रातच आपल्या उदरनिर्वाहासाठी शोध घेत असतात. नदीपात्रात नदीला दान करणे, तसेच पुण्य मिळवणे या हेतूने टाकलेले पैसे आणि अस्थिरक्षा या भागातील काही कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.
मागील अनेक वर्षांपासून नदीपात्रात आपला रोजगार मिळविण्यासाठी येणारी ही माणसं दिवसभर पाण्यात राहून आपला उदरनिर्वाह चालवितात. पुलावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मात्र नेहमीच ही मंडळी पाण्यात काय बरे शोधत असतील, असा प्रश्न पडतो. दक्षिणेची गंगा म्हणून गोदावरी नदीला ओळखले जाते. हिंदू संस्कृतीनुसार गोदावरी नदीपात्राला मोठे महत्त्व असल्याने विविध धार्मिक विधी येथे पार पाडले जातात. यात अंत्यसंस्कार आणि दशक्रियांची संख्या मोठी असते.
औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांतील अनेक गावांतून जुने कायगावच्या गोदावरी नदीजवळ येऊन अंत्यसंस्कार आणि दशक्रिया विधी पार पाडण्यासाठी पसंती दिली जाते. अशावेळी मयताचा विधी पूर्ण झाल्यानंतर अस्थिरक्षा गोदापात्रात टाकल्या जातात. या अस्थिरक्षा नदीपात्रात मिसळल्या की, त्यांचा पाण्यात शोध घेऊन त्यातून काही सोन्या-चांदीची चीजवस्तू मिळते का, याचा शोध घेतला जातो. एवढ्या मोठ्या पात्रातून अशा वस्तू शोधणे म्हणजे मोठे जिकिराचे काम असते, तसेच औरंगाबाद- अहमदनगर महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांतून अनेक जण गोदापात्रात पुण्य मिळावे, यासाठी सुटी नाणी टाकतात. ही नाणी ही माणसे पाण्यातून शोधून काढतात.
दिवसभरात प्रत्येकाला शंभर-दीडशेची कमाई
दिवसभर काम केले की, एकेकाला शंभर-दीडशे रुपये तरी मिळतात. दोन-चार दिवसांतून एकदा नशिबाने एखाद्याला सोन्याची किंवा चांदीची एखादी वस्तू सापडते. या कामात येथील अनेक कुटुंबे आहेत. त्यांना त्यांची लहान मुलेही मदत करतात. नदीपात्रात डुबकी घेऊन चाळणीच्या साह्याने गाळ बाहेर काढायचा. चाळणीतून पाणी खाली पडत गेले की, नुसता गाळ आणि माती चाळणीत शिल्लक राहते. त्यात काही सापडले तर जमा करून बाजूला ठेवायचे आणि परत पाण्यात चाळणी टाकायची, असे काम दिवसभर चालूच असते.
यंदा पाणी कमी
यंदा कमी पर्जन्यामुळे गोदावरी म्हणावी तशी भरलेली नाही. त्यामुळे पात्रात पाणी कमी आहे. अशात पाण्यात पैसे आणि इतर वस्तूंचा शोध घेणे या मंडळींना सोपे जाते.
ज्यांना कला जमली, त्यांचा फायदा
याबाबत लहूबाल सोनवणे म्हणाले की, नदीपात्रात लोकांनी टाकलेल्या चिल्लर पैशांचा किंवा अस्थिरक्षातून दागिन्यांचा शोध घेणे ही एक कला आहे. ज्यांना ती जमली, त्यांचा फायदा जास्त होतो. आम्ही वर्षानुवर्षे हेच काम करीत असल्याने हे काम आम्हाला अंगवळणी पडले आहे.
भागीदारी वाढल्याने उत्पन्न कमी
नदीपात्रात हे काम अगोदर कायगावातील काही मोजकीच कुटुंबे करायची, मात्र आता या कामात बाहेरील काही मंडळीही सहभागी झाली आहे. व्यवसायात भागीदारी वाढल्याने आता येथे वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे, असे भाऊसाहेब फाजगे म्हणाले.