बेकायदा कत्तल केलेल्या वटवृक्षाला निसर्गप्रेमींची श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 07:32 PM2018-09-19T19:32:26+5:302018-09-19T19:33:38+5:30

बेकायदेशीररीत्या वृक्ष तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करून त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय निसर्गप्रेमींनी घेतला

Homage tribute to Treee by nature-lovers | बेकायदा कत्तल केलेल्या वटवृक्षाला निसर्गप्रेमींची श्रद्धांजली

बेकायदा कत्तल केलेल्या वटवृक्षाला निसर्गप्रेमींची श्रद्धांजली

googlenewsNext

औरंगाबाद : वृक्ष निर्जीव नाहीत, तर सजीव आणि परोपकारी आहेत. बेकायदेशीररीत्या त्यांची कत्तल करून त्यांच्या हत्येचे समर्थन होऊ शकत नाही, अशा संतप्त भावनांसह कांचनवाडी येथील वटवृक्षहत्येचा तीव्र शब्दांत निषेध करून निसर्गप्रेमींनी मंगळवारी सकाळी वृक्षाला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बेकायदेशीररीत्या वृक्ष तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करून त्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कांचनवाडीत ८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने ७० ते ८० वर्षे जुना एक वटवृक्ष तोडला. वृक्ष तोडण्यासाठी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली नाही. या प्रकाराविषयी निर्सगप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील निसर्गसंवर्धनाचे काम करणाऱ्या सृष्टीसंवर्धन संस्था, वुई फॉर एन्व्हायर्नमेन्ट, सलीम अली सरोवरसंवर्धन समिती, निसर्ग मित्रमंडळ, प्रयास ग्रुप, जनसहयोग सेवाभावी सामाजिक संस्थांंसह शेकडो निसर्गप्रेमींनी मंगळवारी सकाळी कांचनवाडीत श्रद्धांजली सभा घेतली. कत्तल झालेल्या वृक्षाला पुष्प अर्पण करून दोन मिनिटे मौन बाळगले.

हेल्पलाईन, लीगल सेल
बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी हेल्पलाईन, लीगल सेल असावा, अशी सूचना सभेत करण्यात आली. संबंधितांवर गुन्हे दाखल होऊन कायदेशीर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करण्याचा, भविष्यात अशा प्रकारे वृक्षतोड होऊ नये, म्हणून सक्षम यंत्रणा उभारण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. 

चार झाडे वाचविण्यात यश
कांचनवाडीतील एका वृक्षासंदर्भात काहींनी सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्ज दिला होता. अर्जाचा आधार घेत एका झाडाचे अनेक झाडे करून बेकायदेशीरपणे अनेक झाडे तोडण्यात येणार होती. एक वटवृक्ष तोडल्यानंतर दुसरी झाडे अर्धी तोडण्याच्या आतच हा प्रकार निसगरप्रेमींच्या निदर्शनास आला. आणखी किमान ४ झाडे तोडण्यात येणार होती; परंतु ही झाडे वाचविण्यात यश आले.

निसर्गप्रेमींनी केलेल्या मागण्या
१.सार्वजनिक बांधकाम विभागाचा खुलासा, इतर कागदपत्रे पर्यावरणप्रेमी नागरिकांना उपलब्ध करून देऊन मत, आक्षेप, पुरावे मांडण्याची संधी द्यावी.
२.शहरातील कोणतेही झाड तोडण्यासाठी महापालिकेस अर्ज प्राप्त झाल्यास महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्ष जतन कायदा १९७५ कलम ८ (३) नुसार वर्तमानपत्रांमध्ये सार्वजनिक सूचना व वेबसाईटवर माहिती प्रसिद्ध करावी.
३.संबंधित झाडावर सा. बां. विभागाने सूचना फलक लावून निर्णयाविषयी पूर्वकल्पना द्यावी. 
४.कायद्यानुसार प्रक्रिया पूर्ण करून परवानगी दिल्यानंतर १५ दिवस वृक्षतोड करू नये.

Web Title: Homage tribute to Treee by nature-lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.