सर्वांना घर! १० हजार घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार १५ हजारांचा हप्ता
By विजय सरवदे | Published: September 13, 2024 12:42 PM2024-09-13T12:42:26+5:302024-09-13T12:47:59+5:30
नुकतेच केंद्र शासनाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी २५ हजार घरकुलांचे नव्याने उद्दिष्ट जाहीर केले आहे.
छत्रपती संभाजीनगर : ‘सर्वांना घर’ या घोषणेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ सप्टेंबर रोजी एका क्लिकवर देशभरातील १० लाख घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी १५ हजारांचा पहिला हप्ता जमा करणार आहेत. यामध्ये आपल्या जिल्ह्यातील १० हजार लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची लगबग सुरू आहे.
नुकतेच केंद्र शासनाने आपल्या जिल्ह्यासाठी २५ हजार घरकुलांचे नव्याने उद्दिष्ट जाहीर केले आहे. ‘प्रधानमंत्री आवास सॉफ्टवेअर’मध्ये घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी असते. त्या यादीतील वरिष्ठता सूचीनुसार लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना ऑनलाइन मंजुरी देण्यासाठी त्यांच्याकडून मोबाइल नंबर, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, जागेचे जिओ टॅगिंग, जागेचा नमुना नं. ८चा उतारा आदी कागदपत्रे जमा करून ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी (एफटीओ) गेल्या आठ दिवसांपासून ‘जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा’चे (डीआरडीए) प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांच्यापासून जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, अभिंयते, कंत्राटी कर्मचारी, सर्व गटविकास अधिकारी ही संपूर्ण यंत्रणा व्यस्त आहे. गुरुवार, दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळपर्यंत या कार्यालयाने २१ हजारांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली असून, यापैकी जवळपास ९ हजार ऑनलाइन मंजुरीही दिली आहे.
या योजनेत घरकुल उभारण्यासाठी लाभार्थ्याला १ लाख २० हजारांचे अनुदान दिले जाते. याशिवाय, स्वच्छ भारत मिशनकडून शौचालयासाठी १२ हजारांचे अनुदान आणि ‘नरेगा’अंतर्गत १८ ते २० हजार रुपयांची मजुरी दिली जाते.
तयारीसाठी कमी अवधी
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आपल्या जिल्ह्यासाठी केंद्र शासनाने २५ हजार घरकुलांचे उद्दिष्ट नुकतेच जाहीर केले आहे. यापैकी १० हजार लाभार्थ्यांना १५ हजारांचा पहिला हप्ता १५ सप्टेंबर रोजी एकाच दिवसी जमा होणार आहे. त्यामुळे अतिशय कमी अवधीत लाभार्थ्यांची नावे निश्चित करणे, त्यांच्याकडून कागदपत्रे जमा करणे, ऑनलाइन मंजुरी देणे, पेमेंट प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात आमची सर्व यंत्रणा गुंतलेली आहे.
-अशोक सिरसे, प्रकल्प संचालक, ‘डीआरडीए’
तालुकानिहाय घरकुलांचे नवे उद्दिष्ट
तालुका- घरकुले
छत्रपती संभाजीनगर - १८०३
गंगापूर- ४२८६
कन्नड- ३२८९
खुलताबाद- १०८१
पैठण- ३४७७
फुलंब्री- १३९६
सिल्लोड- ४०३६
सोयगाव- १६८२
वैजापूर- ३९५९