अमित शाह यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा रद्द; १७ सप्टेंबरला हैद्राबादेत करणार ध्वजारोहण
By विकास राऊत | Published: September 14, 2023 07:22 PM2023-09-14T19:22:52+5:302023-09-14T19:23:23+5:30
गृहमंत्री अमित शाह यांचे मराठवाड्यासह पुण्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत
छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा शनिवार १६ सप्टेंबरचा दौरा रद्द झाला आहे. ते १७ सप्टेंबर रोजी हैद्राबादेत होणाऱ्या मुक्तिसंग्राम समारंभाच्या ध्वजारोहणासाठी जाणार आहेत. त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरमय्या हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गृहमंत्री शाह यांचे मराठवाड्यासह पुण्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे केंद्रीय गृहखात्याकडून भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना कळविले आहे.
गृहमंत्री शाह यांच्या उपस्थितीत १६ सप्टेंबर रोजी रिध्दी-सिध्दी लॉन, कलाग्राम येथे सभा घेण्याचे नियोजन होते. त्या सभेला आता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे पोलिस यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. तर भाजपाच्या गोटात दौरा रद्द झाल्यामुळे नाराजी पसरली. गेल्या आठवड्यापासून सभेच्या नियोजनासाठी सुरू असलेल्या बैठका, पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. लोकसभेचे विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून होत आहे. त्या अधिवशेनाचा मूळ विषय अद्याप जाहीर झालेला नाही. अधिवेशनाच्या पुर्वतयारीसाठी भाजपची रणनीति ठरविली जात आहे. त्यात गृहमंत्री शाह यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांचे पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द झाल्याचे बोलले जात आहे. शहरात अभाविपने एस.बी.कॉलेजमध्ये शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला होता याशिवाय पुण्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघा कार्यक्रमाला देखील शाह उपस्थित राहणार होते पण दौराच रद्द झाला आहे.