देह व्यापारासाठी जागा देणाऱ्या घरमालकाला दोन वर्षे कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 06:36 PM2018-06-08T18:36:05+5:302018-06-08T18:39:12+5:30
सातारा परिसरात देह व्यापारासाठी जागा उपलब्ध करून देणारा घरमालक तुषार राजेंद्र राजपूत (३०, रा. पेन्शनपुरा, छावणी) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. जांभळे यांनी दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.
औरंगाबाद : सातारा परिसरात देह व्यापारासाठी जागा उपलब्ध करून देणारा घरमालक तुषार राजेंद्र राजपूत (३०, रा. पेन्शनपुरा, छावणी) याला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. जांभळे यांनी दोन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.
यासंदर्भात गुन्हे शाखेचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन पवार यांनी फिर्याद दिली होती. सातारा परिसरातील निवासी परिसरात देहव्यापार चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी ४ मे २०१२ रोजी रात्री ९.१५ वाजता सातारा परिसरातील साई मंदिराच्या मागे चालू असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर बनावट ग्राहक पाठविला होता.त्याच्या इशाऱ्यावरून पोलिसांनी बंद घरावर छापा मारून दोन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेतले होते. यावरून या पाच जणांविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील बी. एम. राठोड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, हा सामाजिक व नैतिक अध:पतनाचा गुन्हा आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती त्यांनी केली. सुनावणीअंती न्यायालयाने वरील शिक्षा सुनावली.