घरकामात मदत करण्याच्या बहाण्याने पळविले साडेआठ तोळ्याचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 09:01 PM2019-10-14T21:01:00+5:302019-10-14T21:01:32+5:30
पोलिसांनी संशयावरून एकाच कुटुंबातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
औरंगाबाद: घरकामात मदत करण्याच्या बहाण्याने घरी आलेल्या अल्पवयीन मुलीने(विधीसंघर्षग्रस्त बालिका) घरातील लोकांची नजर चुकवून साडेआठ तोळ्याचे सोन्याचे दागिने पळविल्याचा प्रकार समोर आला. मुकुंदवाडी पोलिसांनी संशयावरून एकाच कुटुंबातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
राहुल बनसोडे, एक महिला आणि विधीसंघर्षग्रस्त बालिकेचा यात समावेश आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, मुकुंदवाडीतील अंबिकानगर येथील रहिवासी भिमराव बंडूजी जाधव हे २९ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबर दरम्यान आजारी पत्नीला घेऊन रुग्णालयात गेले होते. तेव्हा त्यांची विवाहित मुलगी घरी होती. मुलीला घरकामास मदत करण्यासाठी शेजारी राहणारी अल्पवयीन मुलगी त्यांच्या घरी येत होती. ७ रोजी जाधव यांना कपाटातील साडेआठ तोळ्याचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
यानंतर त्यांनी प्रथम त्यांच्या मुलीकडे विचारणा केली असता घराशेजारी राहणारी अल्पवयीन मुलीशिवाय अन्य कोणीही घरी आले नसल्याचे तिने सांगितले. त्यांनी संशयित मुलीकडे विचारणा केली असता तिने चोरी केलेले दागिने आई मीना आणि चुलतभाऊ राहुलकडे दिल्याचे सांगितले. त्यांनी मात्र याविषयी नकार दिल्याने जाधव यांनी १३ आॅक्टोबर रोजी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदविली. या तक्रारीत संशयित आरोपी म्हणून राहुल बनसोडे , मीना बनसोडे आणि अल्पवयीन मुलीचे नाव सांगितले. पोलिसांनी संशयावरून त्यांना ताब्यात घेतले.पोलीस उपनिरीक्षक ढोकरे हे तपास करीत आहेत.