औरंगाबादमध्ये 'हनी ट्रॅप'; खंडणीसाठी अभियंत्याचे अपहरण, पोलिसांनी चौघांना पकडले

By राम शिनगारे | Published: December 28, 2022 08:32 PM2022-12-28T20:32:08+5:302022-12-28T20:32:38+5:30

दहा लाखाच्या खंडणीसाठी अभियंत्याचा काढला विवस्त्र व्हिडिओ; सातारा पोलिसांनी सापळा रचून चौघांना पकडले

'Honey Trap' in Aurangabad; Engineer kidnapped for ransom, police nabs four | औरंगाबादमध्ये 'हनी ट्रॅप'; खंडणीसाठी अभियंत्याचे अपहरण, पोलिसांनी चौघांना पकडले

औरंगाबादमध्ये 'हनी ट्रॅप'; खंडणीसाठी अभियंत्याचे अपहरण, पोलिसांनी चौघांना पकडले

googlenewsNext

औरंगाबाद : २७ वर्षाच्या अभियंत्यास प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेने संबंध प्रस्थापित केले. त्यातुन युवकास मागील २० दिवसांपासून ब्लॅकमेल करीत १० लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत होती. तुझ्यावर गुन्हा दाखल झाला असून मुंबई क्राईम ब्रँचचा पोलिस निरीक्षक असल्याची बतावणी करून राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने युवकास गाडीमध्ये बसवून बाहेर नेऊन लुटले. त्याची बुलेट ओढुन नेली. सर्व आपबिती तरुणाने सातारा पोलिसांना सांगितल्यानंतर पथकाने सापळा रचून चौघांना बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.

राजकीय पक्षाचा पदाधिकारी संजय पंडित जाधव (रा. खोकडपुरा), मंजुश्री बाबासाहेब बोर्डे पाटील (रा. सदर), प्रतिक सुधीर जाधव (रा. समर्थनगर), नकीब नसीर पटेल (रा. बीडबायपास रोड, पटेल लॉन्सजवळ) ही अटक आरोपींची नावे असून, अक्षय नावाचा आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यातील २७ वर्षांचा अभियंता सातारा परिसरात राहतो. त्याचा मित्र आरोपी महिलेच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. तेव्हा मित्राकडे येणे-जाण्यातुन त्याची महिलेशी ओळख झाली. त्या महिलेने मित्राकडूनच पीडित तरुणाचा मोबाईल नंबर घेऊन फोनवर बोलुन, मेसेज करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 

ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली. त्यातुन त्याचे दोन वेळा संबंधही प्रस्थापित झाले. त्यानंतर तरुणाच्या मित्राने खोली बदलल्यामुळे दोघांचा संपर्क तुटला. या घटनेनंतर १० डिसेंबर रोजी महिलेचा फोन आला. तेव्हापासून तिने अनेकवेळा फोन केले. १९ डिसेंबर रोजी एका बीएमडब्ल्यू कारमध्ये (एमएच २२ यू ७७७७) दोन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी तरुणाला मेसेज करून तुमचे ऑफिसचे पार्सल आल्याची थाप मारून बोलावून घेतले. तरुण भेटल्यानंतर त्यास महिलेसोबतच्या संबंधावरून ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. तरुणाला त्याच्या कार्यालयासमोरून गाडीत जबरदस्तीने बसवले. तेव्हा संजय जाधव याने मी मुंबई पोलिस क्राईम ब्रॅचचा पीआय प्रदीप घुगे असून तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. तुला अटक केली जात असल्याचे सांगत बीडबायपास मार्गे हॉटेल पाटीलवाडा येथे नेण्यात आले. रस्त्यातच महिलेच्या अत्याचाराचे प्रकरण मिटविण्यासाठी दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली. 

हॉटेलमध्ये दोघांनी दारू पिल्यानंतर तरुणाला विवस्त्र करून मारहाण करीत त्याचा व्हिडिओ काढला. जेवणाचे, दारूचे बिलही तरुणास देण्यास लावले. तरुणाची संपूर्ण माहिती लिहुन घेत कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. तसेच १० लाख रुपये नाहीत, असे तरुणाने सांगितल्यानंतर कमीत कमी पाच लाख रूपये देण्याची मागणी केली. तेव्हा त्याने मित्रांकडून २५ हजार रुपये मागवून घेतले. ते पैसे एटीएममधुन काढून आरोपींकडे दिले. त्याचवेळी तरुणाची त्याच्या कार्यालयाजवळ लावलेली बुलेटची चावी जबरदस्तीने घेऊन बुलेट घेऊन गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सपोनि. विनायक शेळके करीत आहेत. 

पाच लाख दे अन् बुलेट घेऊन जा
पीआय बनलेल्या संजय जाधव याने २१ डिसेंबर रोजी तरुणाची भेट घेऊन प्रकरण मिटविण्यासाठी पाच लाख रूपये लवकर दे आणि बुलेट घेऊन जात. यात मी फक्त मध्यस्थी करीत आहे असे सांगितले. २७ डिसेंबर रोजीही संजय जाधवसह इतरांनी फोनवरून खंडणीची मागणी केली. तेव्हा घाबरलेल्या युवकाने आपबिती सातारा ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांना सांगितले.

पोलिसांनी रचला सापळा
आरोपी संजय जाधव व प्रतिक जाधव हे तरुणाला धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वात निरीक्षक पोतदार, सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक देविदास शेवाळे, संभाजी गोरे, अनिता फासाटे, सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे, अनिलकुमार सातदिवे, सुनील धुळे, कारभारी नलावडे, मनोज अकोले, भैरवी बागुल, सुनिता गोमलाडू, दीपक शिंदे, सुनील पवार, रामेश्वर कवडे, कपील खिल्लारे यांच्या पथकाने सापळा रचला. यात तरुणाकडून पैसे घेताना पंचासमक्ष संजय जाधवसह त्याचा साथीदार पकडला.

Web Title: 'Honey Trap' in Aurangabad; Engineer kidnapped for ransom, police nabs four

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.