गुन्ह्याचा सन्मानाने स्वीकार; 'राज'सभेचे आयोजक म्हणाले ही तर मोगलाईची सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 04:28 PM2022-05-03T16:28:17+5:302022-05-03T16:43:27+5:30
राजसभेसाठी घातलेल्या १६ पैक्की १२ अटींच्या उल्लंघनाचा अहवाल पोलीसांनी दिला असल्याची माहिती आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात १ मे रोजी झालेल्या सभेतील भाषणावरून गुन्हा दाखल झाला आहे. यात राज ठाकरे यांच्यासोबत सभेचे आयोजक राजू जावळीकर यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा सन्माने स्वीकार करतो, ही तर मोगलाई असल्याची प्रतिक्रिया जावळीकर यांनी यानंतर दिली आहे. गुन्ह्यासोबतच मनसे कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी झालेल्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटीशर्थीचे उल्लंघन झाल्याने सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तब्बल १६ अटी मनसेच्या राजसभेच्या आयोजनावर घातल्या होत्या. यातील १२ अटींचे उल्लंघन झाले असल्याचा पोलिस अहवालात असल्याची माहिती आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आयोजक राजू जावळीकर आणि इतरांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम ११६, ११७, १५३ अ आणि मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर राजू जावळीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या गुन्ह्याचा आम्ही स्वीकार करतो. आमच्यासाठी अशा केस अंगावर घेणे नित्य आहे.मात्र, कार्यक्रम आयोजना दरम्यान पोलिसांनी खूप सहकार्य केले ते आता दिसत नाही. तेव्हा वाटत होते लोकशाही आहे. आता वाटते ही तर मोगलाईला सुरुवात आहे.
कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक नोटीस
३ मे नंतर मशिदीवरील भोंगे बंद झाले नाही तर मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजविणार असा इशारा मनसेने दिला होता. या पार्श्वभूमीवर शहरारील मनसेच्या १५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत. परंतु, आम्हाला स्थानबध्द केले तरी आमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत. राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशाचे शंभर टक्के पालन करण्यात येईल असा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे.