छत्रपती संभाजीनगरमधील ऑनर किलिंगवर अहवाल देण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:50 IST2025-01-08T12:49:57+5:302025-01-08T12:50:31+5:30
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांचे पोलिस महासंचालकांसह पोलिस आयुक्तांना आदेश

छत्रपती संभाजीनगरमधील ऑनर किलिंगवर अहवाल देण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे आदेश
छत्रपती संभाजीनगर : परजातीय मुलासोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून बहिणीला दरीत ढकलून हत्या केल्याच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली. ही घटना संतापजनक व तितकीच मानवी मूल्यांवर आघात करणारी आहे. या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करून दोन दिवसांमध्ये अहवाल सादर करा, असे आदेश आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राज्याच्या पोलिस महासंचालक व शहराच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
सोमवारी तिसगाव शिवारातील खवड्या डोंगरावर घडलेल्या घटनेने समाजमन हादरून गेले. नम्रता गणेश शेरकर (१७, रा. शहागड) या मुलीचे दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध जुळण्याची माहिती कुटुंबाला समजली होती. त्यातून कुटुंबामध्ये मोठे वाद सुरू होते. या प्रेमप्रकरणापासून मुलीला लांब नेण्यासाठी तिच्या वडिलांनी वळदगाव येथे राहणाऱ्या लहान भावाकडे तिला आणून सोडले होते. तिला समजावून सांगण्याच्या बहाण्याने तिचा चुलत भाऊ हृषीकेश याने तिला सोमवारी दुपारी खवड्या डोंगरावर नेत खोल दरीत ढकलून दिले. यात तिचा मृत्यू झाला.
ही मुलींच्या हक्कांची, स्वातंत्र्याची पायमल्ली
- मंगळवारी राष्ट्रीय महिला आयोगाने यासंदर्भाने पत्र जारी केले. त्यात या गंभीर घटनेबद्दल आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांनी संताप व्यक्त करीत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. ही घटना म्हणजे मुलीच्या हक्कांची आणि सन्मानाची पायमल्ली आहे.
- प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोप निश्चित करण्यासाठी स्वतंत्र चौकशी करून ती वेळेत पूर्ण करा.
- आयोगाला दोन दिवसांत एफआयआर प्रत आणि तपशीलवार तपास अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.