मराठी कवितेला समृद्ध करणाऱ्या कवयित्रीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 01:17 PM2019-12-19T13:17:33+5:302019-12-19T14:03:51+5:30

अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यानंतर मराठी साहित्यिक, वाचकांमध्ये आनंद

Honor of a poet who enriches Marathi poetry | मराठी कवितेला समृद्ध करणाऱ्या कवयित्रीचा सन्मान

मराठी कवितेला समृद्ध करणाऱ्या कवयित्रीचा सन्मान

googlenewsNext

औरंगाबाद : कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ काव्यसंग्रहाला प्रतिष्ठेचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला आणि शहरातील साहित्यिक व वाचकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. एका मराठी कवयित्रीचा झालेल्या या सन्मानाने समाधान व्यक्त केले जात आहे. 

मराठी कवितेला समृद्ध करणाऱ्या कवयित्रीचा सन्मान
अनुराधातार्इंनी ३० वर्षे कवितांचे लेखन केले. कवितांच्या निर्मितीमध्ये त्यांनी मराठी साहित्यातील सगळे संस्कार पचवून स्वत:ची वाट निर्माण केली. खेडे आणि शहरातील स्त्रियांची परिस्थिती अचूकपणे शब्दबद्ध केली. खेड्यातील स्त्रियांच्या जीवनात असणारे दु:ख, प्रतिमा आणि शहरातील स्त्रियांची घालमेल त्यांच्या कवितेत आहे. त्यात कुठेही अकांडतांडव नाही. नेमक्या शब्दांत रेखाटले आहे. गेल्या काही काळात मराठी कवितेला ज्या काही कवींनी समृद्ध करण्याचे काम केले. मराठी कवितेला उच्चठिकाणी घेऊन गेले. त्यात अनुराधाताई अग्रभागी आहेत.  अजिंठ्याच्या भूमितील कवीचा सन्मान सुखावणारा आहे.
- ना.धों. महानोर, ज्येष्ठ साहित्यिक

आनंददायक घटना
अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर होणे ही माझ्यासारख्या त्यांच्या चाहत्यांच्या दृष्टीने आनंददायक घटना आहे. त्यांनी कसलाही अभिनिवेश न बाळगता स्पष्टपणे मोजकेच पण सकस लेखन केले आहे. त्या कधीही प्रसिद्धीच्या मागे लागल्या नाहीत अथवा सभा, संमेलनातून मिरवल्या नाहीत. त्यांच्या कवितेचा उचित सन्मान झाला. त्यांचे अभिनंदन.
- रा.रं. बोराडे, ज्येष्ठ साहित्यिक

स्वत:ची मुद्रा उमटविणाऱ्या कविता
आमच्या आदर्श कवयित्री अनुराधा पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराने मला अनेक अर्थाने आनंद झाला आहे. पहिले कारण, म्हणजे अकादमीचा पुरस्कार कवितेला मिळाला. दुसरे कारण म्हणजे कवयित्रीला मिळाला व तिसरे कारण म्हणजे मराठी कवयित्रीला मिळाला. त्यांनी लिहिलेल्या गांभीर्यपूर्ण कविता आमच्यासारख्या नव्या कवींसाठी आदर्श आहे. त्यांनी लिहिलेल्या भाव कविता मराठी कवितेत स्वत:ची मुद्रा उमटविणारी आहे. ज्यांना आपण पाहिले त्यांच्या कविता वाचल्या, त्यांच्याशी आपण बोलत आलो. त्या कवयित्रीला पुरस्कार मिळाला याचा मनस्वी आनंद झाला आहे. 
- दासू वैद्य, लेखक,कवी

पुरस्कार मिळण्यास उशीर झाला
पत्नीला पुरस्कार मिळाल्याचा आनंद जसा कोणत्याही पतीला होईल, तसाच आनंद मलाही झाला आहे. या रूपाने एक राष्ट्रीय पुरस्कार घरात येणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे; पण खरे सांगायचे तर खूप आधीच हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे वाटते. कारण याआधीही खूप चांगले काव्यसंग्रह येऊन गेले. त्यामुळे पुरस्कार मिळायला उशीरच झाला. 
- कौतिकराव ठाले पाटील

समग्र मानवतावादी स्त्री कवितेचा सन्मान
मूल्यविहीन काळातील स्त्री जीवनाचे संवेदनसुक्त स्वयंमसिद्ध नैसर्गिक प्रतिमा प्रतीकाद्वारे मांडणारी अनुराधा पाटील यांची कविता स्त्रीकेंद्री असूनही स्त्रीवादी चौकट मोडीत काढीत मानवतावाद मूल्यवर्धित करते. तिचा सन्मान हा समग्र मानवतावादी स्त्री कवितेचा सन्मान आहे.
- डॉ. कैलास अंभुरे, युवा समीक्षक

एका समर्थ कवयित्रीचा सन्मान 
ग्रामीण जीवनातील शेतकऱ्यांचे दु:ख आणि शहरी जीवनात प्राप्त होणारे परकेपण यांचे सूक्ष्म आणि जिवंत चित्रण करणारी कविता अनुराधाबार्इंनी लिहिली आहे. मराठीत या प्रकारची कविता प्रथमच लिहिली गेली आहे. एक समर्थ कवयित्रीचा झालेला हा सन्मान मराठी रसिकांना समाधान देऊन जातो. 
- सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक 

मराठवाड्यातील वाङ्मय वर्तुळात आनंद
अनुराधा पाटील या श्रेष्ठ कवयित्री आहेत. त्यांना पुरस्कार मिळाल्याने मराठवाड्यातील वाङ्मय वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे. अकादमीचा पुरस्कार मराठवाड्यातील कवयित्रीला मिळावा ही अभिमानाची बाब आहे.     - न्या. नरेंद्र चपळगावकर 

आयुष्याची समग्र कविता
स्वत:च्या वाट्याला आलेला अटळ दु:खाचा समंजसपणे स्वीकार करतानाच सत्त्वशील जगण्यासाठी बळ मिळविणारी अनुराधा पाटील यांची कविता आहे. या कवितेची साधी-सहज आणि लोकजीवनाला स्पर्श करणारी भाषा हे सर्वात मोठे बलस्थान आहे. गेल्या चार दशकांपासून मराठी भावकवितेत त्यांच्या कवितेने  आपला स्वत:चा ठसठशीत असा चेहरा निर्माण केला आहे. अर्थवादी प्रतिमांमधून तरल अशी अनुभूती त्यांची कविता वाचकांना देते. ‘कदाचित अजूनही’ या कवितासंग्रहात तर अनुभवाकडे पाहण्याच्या बाईपणाच्या मर्यादा ओलांडून त्यांच्या कवितेने आयुष्याच्या समग्रतेलाच कवेत घेतले आहे, अशा कवितेचा सन्मान ही वाङ्मयाच्या क्षेत्रातील अर्थपूर्ण अशी घटना आहे.
- आसाराम लोमटे, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथाकार

कवितेच्या आंतरिकतेशी नाते सांगणाऱ्यांचा सन्मान
अनुराधा पाटील हा मराठी कवितेमधला एक खूप संयमित आणि अतिशय ‘आतला’ असा सशक्त स्वर आहे. त्यांचा ‘दिगंत’ हा कवितासंग्रह मला महाविद्यालयात अभ्यासाला होता, तेव्हापासून ‘कदाचित अजूनही’पर्यंतच्या त्यांच्या पाचही संग्रहांतल्या मी वाचलेल्या कविता क्रमाक्रमाने, एका खूप नेमक्या तरीही पटकन व्याख्येत पकडता येऊ नयेत इतक्या तरल आणि विशेषत: करुणा आणि आस्थेच्या अवकाशाने भारलेल्या स्त्री-संवेदनेचा, अतिशय चिंतनशील असा प्रवास, प्रवाह चित्रित करणाऱ्या आहेत. सत्त्वशील कवितेचा हा सन्मान त्यांच्या एकट्याचा नव्हे, तर कवितेच्या तशा आंतरिकतेशी नाते सांगणाऱ्या प्रत्येक कवी-कवयित्रीच्या कवितेचा हा सन्मान आहे.    
- बालाजी सुतार, प्रसिद्ध कवी

अतिशय परिपक्व, समंजस कवितेचा सन्मान
आधुनिक मराठी कवितेतील अतिशय परिपक्व, समंजस कवितेला मिळालेला हा सन्मान आहे. अनुराधा पाटलांची कविता वगळून मराठी कवितेचा इतिहास लिहिता येणार नाही, इतकी ती महत्त्वपूर्ण आहे. अतिशय शांतपणे, कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता गेल्या काही दशकांपासून त्या कविता लिहीत आहेत.  कविता आणि शब्दांवरच त्यांचे निस्सीम प्रेम आहे. खरे तर त्यांच्या कवितेला हा सन्मान पूर्वीच मिळायला हवा होता. हा सन्मान केवळ मराठवाड्यातल्या कवितेचा नव्हे, तर भारतीय कवितेचा सन्मान आहे, असे मी समजतो.
- श्रीकांत देशमुख, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी

स्वत:ची विचारधारा पक्की असलेली कवयित्री 
अनुराधा पाटील यांना पुरस्कार मिळाला तोही साहित्य अकादमीचा ही अभिनंदनीय बाब आहे. त्या एक उत्तम कवयित्री आहेत. हे त्यांनी अनेकदा सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही त्या उत्तम कवयित्री म्हणून त्यांची ख्याती पसरली आहे. त्यांची स्वत:ची विचारधारा पक्की आहे. त्यांची कविता अतिशय हृदयस्पर्शी, प्रतिमा तरल, भावपूर्ण अशी आहे. एका कवयित्रीला पुरस्कार मिळाला याचाही मला मोठा आनंद झाला आहे. 
- छाया महाजन, ज्येष्ठ साहित्यिक 

प्रत्येक कवींना आनंद देणारा पुरस्कार
अनुराधातार्इंना मिळालेला पुरस्कार हा मराठीतल्या समकालीन सर्वच कवींना सुखावणारा आहे. त्यांची कविता विलक्षण प्रतिभेची आणि प्रचंड उंचीची आहे. उशिरा का होईना साहित्य अकादमीने त्यांच्या कवितेची दखल घेऊन यथोचित सन्मान केला. तार्इंच्या कवितांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच माझ्यासारखे मराठवाड्यातले कवी लिहू लागले. हा सन्मान म्हणजे गेल्या अर्धशतकातील संयत स्त्रीभावनेचा सन्मान आहे. 
- वीरा राठोड, युवा साहित्य पुरस्कार अकादमी पुरस्कार प्राप्त कवी

व्रतस्थ कवयित्रीचा सन्मान
अनुराधा पाटील हे मराठी कवितेत गेली साडेतीन दशके चर्चेत असणारे, सकस अभिव्यक्ती करणारे नाव आहे. एकूण भारतीय भाषेतील वर्तमान स्त्रियांच्या कवितेचा विचार करता स्रीनिष्ठ अनुभवांचे बहुपदरी दु:खाचे प्रतिमांकन आणि लयबद्ध भाषिक प्रकटीकरण व अगदी तरल भावोत्कटपणे येणारी कविता म्हणून त्यांची कविता वेगळी ठरते. ‘दिगंत’, ‘तरीही’, ‘दिवसेंदिवस’, ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ आणि ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहातील त्यांची कविता एका समान अंतस्थ सूत्रात अवतरते.  प्रतिमा, प्रतीके आणि भाषिक लय, सहजसुंदर शब्दकळा यातून आकाराला आलेले स्रियांचे भावविश्व मानवी मनाचे तळ ढवळून काढणारे आहे. एका अस्सल कवितेचा व व्रतस्थ कवयित्रीचा साहित्य अकादमीने सन्मान केला याचा आनंद अधिक आहे. 
- डॉ. गणेश मोहिते, कथाकार, स्तंभलेखक

संपूर्ण स्त्रियांच्या कवितेचा सन्मान
अनुराधातार्इंची कविता ग्रामीण भागातील जाणिवांची मांडणी करणारी आहे. त्यांच्या कवितेतून जी स्त्री व्यक्त होते, ती प्रत्येक स्त्रीला एकदम जवळची वाटते. कवितेतून व्यक्त होणारा परमात्मभाव हा संपूर्ण स्त्रीजातीला जोडणारा आहे. त्यांच्या कवितेला हा सन्मान मिळालेला असला तरी हा संपूर्ण स्त्री कवितेचा सन्मान आहे.     
- डॉ. संजीवनी तडेगावकर, कवयित्री, जालना

Web Title: Honor of a poet who enriches Marathi poetry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.