संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगरच्या सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या योगदानाची दखल
By मुजीब देवणीकर | Published: March 18, 2023 04:50 PM2023-03-18T16:50:32+5:302023-03-18T16:51:50+5:30
स्मार्ट सिटीच्या कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटर प्रकल्पाचा उल्लेख
छत्रपती संभाजीनगर :स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत शहरात २०० कोटी रुपये खर्च करून तब्बल ८५० सीसीटीव्ही लावण्यात आले. शहराच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प राबविण्यात आला. गुरुवारी संयुक्त राष्ट्राच्या एका बैठकीत ‘सीसीटीव्ही कंट्रोल रूमच्या उत्कृष्ट योगदाना’ची दखल घेण्यात आली. वुमन-२० च्या बैठकीत जी-२० च्या समन्वयक धरित्री पटनाईक यांनी प्रकल्पाचा उल्लेख ‘महिला सक्षमीकरणात मोठे योगदान’ असा उल्लेख केला. यामुळे शहराचा या बैठकीत गौरवाने नामोल्लेख झाला आहे.
शहरातील अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी स्मार्ट सिटीच्या कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटरची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. शहरात ४५० ठिकाणी ८५० सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्हीचे फुटेज पाहण्यासाठी पोलिस आयुक्तालय आणि स्मार्ट कार्यालयात कमांड कंट्रोल केंद्र आहेत. पोलिसांना शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी याची मदत होत आहे. विशेष म्हणजे चौकाचौकात कॅमेरे असल्यामुळे महिला व मुलींना सुरक्षित वातावरण तयार झाले.
संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रुचिरा कंबोज, डब्ल्यू-२० इंडिया अध्यक्ष डॉ. संध्या पुरेचा व यूएन वुमनच्या कार्यकारी संचालक सीमा सामी बहौस यांच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा केली. वुमन-२० च्या मुख्य समन्वयक धरित्री पटनायक यांनी संचालन केले. तंत्रज्ञानाद्वारे महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान येत असल्यावर त्यांनी भर दिला. त्यांनी छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटीचे उदाहरण दिले. बैठकीत विविध देशांचे १५० प्रतिनिधी व ऑनलाइन माध्यमाने अनेकजण सहभागी झाले होते. विशेष म्हणजे फेब्रुवारी २७-२८ फेब्रवारी रोजी शहरात वुमन-२० बैठक यशस्वीरीत्या पार पडली.