घाटी रुग्णालयाच्या धर्तीवर राज्यात आदरपूर्वक प्रसूती सेवा राबवली जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:52 PM2018-05-28T13:52:07+5:302018-05-28T13:57:25+5:30
घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील आदरपूर्वक प्रसूती सेवा उपक्रमाची प्रशंसा काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या देशभरातील २३ वैद्यकीय संचालकांच्या बैठकीत झाली.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागातील आदरपूर्वक प्रसूती सेवा उपक्रमाची प्रशंसा काही दिवसांपूर्वीच मुंबईत झालेल्या देशभरातील २३ वैद्यकीय संचालकांच्या बैठकीत झाली. घाटीच्या प्रसूती विभागाने राबवलेली आदरपूर्वक प्रसूती सेवा पद्धत आता ‘लक्ष्य’ या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभर लागू होणार आहे. राष्ट्रीय पातळीवर हा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीनेही पाऊल पडले आहे.
घाटी रुग्णालयात वर्षभरात १८ हजारांहून अधिक प्रसूती आणि ४ हजारांवर सिझेरियन प्रसूती होतात. दररोज ५० ते ६० प्रसूती होतात. रुग्णालयात दुर्व्यवहारापासून मुक्ती, प्रसूतीदरम्यान सोबतीसाठी व्यक्तीची निवड, एकांतता तथा गोपनीयता, सन्मानपूर्ण व्यवहार, भेदभावापासून मुक्ती, उच्चस्तरातील आरोग्य देखभाल आणि कोणत्याही प्रकारच्या दबावापासून मुक्ती हे गरोदर मातांचे ७ हक्क आहेत. या सर्व हक्कांचे पालन घाटी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र विभागात होत आहे. गेल्या काही वर्षांपासून घाटी रुग्णालयात आदरपूर्वक प्रसूती आणि मातृत्वासाठी प्रयत्न केले जात आहेत.
१२ मे रोजी झालेल्या मुंबईतील बैठकीत प्रसूतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा यांनी परिषदेत मांडल्यानंतर विभागाच्या कामाचा गौरव झाला. आगामी काळात प्रत्येक शासकीय रुग्णालयात महिलांना सन्मानजनक मातृत्व मिळावे, असा निर्णय घेण्यात आला आहे. घाटीतील प्रसूती विभागात होत असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी २९ आणि ३० मे रोजी दिल्ली येथील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपायुक्त दिनेश बासवाल आणि जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाचे सहायक संचालक अनिरुद्ध देशपांडे प्रसूती विभागाला भेट देणार आहेत, अशी माहिती डॉ. गडप्पा यांनी दिली.