बळीराजाच्या आशा पल्लवित

By Admin | Published: July 8, 2014 11:14 PM2014-07-08T23:14:11+5:302014-07-09T00:32:53+5:30

लातूर : बरेच दिवस ओढ दिल्यानंतर वरुणराजाने मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर बळीराजाची धाकधूक वाढली होती़

The hope of the victim spreads | बळीराजाच्या आशा पल्लवित

बळीराजाच्या आशा पल्लवित

googlenewsNext

लातूर : बरेच दिवस ओढ दिल्यानंतर वरुणराजाने मंगळवारी पहाटेपासून जिल्ह्यात हजेरी लावली आहे़ मृग व आर्द्रा नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर बळीराजाची धाकधूक वाढली होती़ यंदा खरीपाच्या पेरण्या होतील की नाही, अशीही चिंता व्यक्त करण्यात येत होती़ परंतु, रविवारी पूनर्वसू नक्षत्राचे आगमन होताच टप्प्याटप्प्याने जिल्हाभरात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे़ मंगळवारी पहाटे जवळपास सर्वच तालुक्यात पुनर्वसू बरसले़ त्यामुळे पेरण्यांना आता सुरुवात होण्याची अपेक्षा वाढली आहे़
गतवर्षी जेथे जून महिन्यात १३५ मिलीमीटर पाऊस झाला होता़ तिथे यावर्षी केवळ ३५ मिलीमीटर पाऊस झाला आहे़ त्यातही प्रारंभीच्या टप्प्यात देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने अनेकांनी पेरण्या केल्या होत्या़ मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे़ जुलै महिन्याचा पहिला आठवडाही कोरडाच गेल्यानंतर मंगळवारी पहाटेपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे़ दुपारच्या सुमारासही काही भागात चांगला पाऊस झाला़ पहाटे झालेल्या पावसाची नोंद २४़३९ मिलीमीटर इतकी झाली आहे़ त्यात सर्वाधिक पाऊस उदगीर तालुक्यात ४६़७१ मिमी़ इतका झाला़ त्यापाठोपाठ जळकोट तालुक्यात ४०, शिरुर अनंतपाळ ३५, लातूर व चाकूर २८, देवणी १६, औसा व निलंगा १४, रेणापूर १३ तर सर्वात कमी अहमदपूर तालुक्यात ५ मिमी़ इतका पाऊस झाला आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़
सोयाबीन पुन्हा वाढणाऱ़़
दरवर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत चालली आहे़ यंदाही अशीच परिस्थिती राहणार आहे़ सोयाबीनखालील सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९२ हजार हेक्टर्स इतके आहे़ त्यात यावेही ८ हजार हेक्टर्सनी वाढ होईल असा कृषी विभागाचा अंदाज होता़ परंतु, पाऊस लांबल्याने मूग, उडीदाची पेरणी आता जवळपास होणार नाही, अशी स्थिती आहे़ त्यामुळे पुन्हा सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन यावेळी सव्वादोन लाख हेक्टर्सपर्यंत सोयाबीनची पेरणी होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे़
जूनमध्ये पाऊस होत नसल्याने शेतकरी खत-बियाणे खरेदीसाठी बाजारपेठेकडे फिरकला नव्हता़ परंतु, पाऊस होईल या आशेवर गेल्या काही दिवसांपासून त्यांनी खरेदी सुरु केली होती़ आता पेरणीयोग्य पाऊस होत असल्याने आता बाजारपेठेत गर्दी आणखी वाढली आहे़
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस़़़
सोमवारी संध्याकाळी लातूर शहरात दिवसभर पावसाची रिपरिप होती़ मंगळवारी सायंकाळी ६ वाजेनंतर तब्बल अर्धा तास मोठा पाऊस झाला़ जिल्ह्यातील चाकूर, अहमदपूर, रेणापूर, औसा, उदगीर व देवणी तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे़ मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर बळीराजा धास्तावला होता़ त्यामुळे पेरण्याही रखडल्या होत्या़ मात्र रविवारपासून पावसाला प्रारंभ झाला़ त्यामुळे पेरणीचा मार्ग मोकळा झाला आहे़ दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अहमदपूर येथे मेघगर्जनेसह पाऊस झाला़
केवळ ८ टक्के पेरण्या़़़
पाऊस गायब झाल्याने जिल्ह्यातील पेरण्या यावेळी चांगल्याच खोळंबल्या आहेत़ आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ गतवर्षी जवळपास ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या होत्या़ यंदा पेरणी झालेल्या ४६१५० हेक्टर्स क्षेत्रापैकी ३१२६६ हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरा झाला आहे़ ८२५६ हेक्टर्सवर तूर, ३०२५ हेक्टर्सवर ज्वारी, १५०४ हेक्टर्सवर मूग, १७२ हेक्टर्स उडीद तर चाऱ्यासाठी ४३९ हेक्टर्स क्षेत्रावर मक्याची लागवड करण्यात आली आहे़

Web Title: The hope of the victim spreads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.