हाहाकार ! वैजापूर, खुलताबादेत आढळली अमेरिकन लष्करी अळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 06:41 PM2019-06-28T18:41:19+5:302019-06-28T18:45:24+5:30
कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला ज्याची भीती होती ते आता सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहे.
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील संवदगाव, लोणी व खुलताबाद तालुक्यातील सालुखेडा या गावात मका पिकावर लागवडीपासून केवळ सतरा ते अठरा दिवसांत अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला ज्याची भीती होती ते आता सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यात मक्याचे सर्वाधिक क्षेत्र असून, उर्वरित भागातील शेतकऱ्यांनी नांगरणीपासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नाही तर मक्याचे सर्व पीक नष्ट होऊन जाईल, असा धोक्याचा इशारा जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार यांनी दिला आहे.
मका पिकावर नवीन अमेरिकन लष्करी अळीचे गंभीर संकट उद्भवल्याने जगभरात मका उत्पादक देश संकटात सापडले आहेत. मागील वर्षी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव शेजारी कर्नाटकात आढळला होता. यंदा खरीप हंगामात महाराष्ट्रात मका पिकावर लष्करी अळी थैमान घालील, असा इशारा कृषी विद्यापीठ व कृषी विभागाने दिला होता. अनुकूल हवामान, लागवडीतील प्रयोगशीलता आणि नवीन तंत्रज्ञानामुळे औरंगाबाद जिल्हा राज्यात मका उत्पादनात ‘नंबर वन’ ठरला आहे. यंदा खरीप हंगामात २ लाख ३९ हजार हेक्टरवर मका लागवड प्रस्तावित आहे. यामुळे सर्वांचे या जिल्ह्यावर लक्ष टिकून राहिले आहे. ७ जून व ११ जून रोजी मक्याची लागवड झालेल्या शेतात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.
कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील संवदगाव व लोणी येथे तसेच खुलताबाद तालुक्यातील सालुखेडा येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मका पिकावर लष्करी आळी आढळून आली. मका लागवडीपासून आठव्या दिवसांपासून लष्करी अळीचे अंडी घालणे व अळ्या तयार होणे प्रक्रिया सुरू होते. मक्याच्या कोवळ्या पानांवर पांढरे ठिपके, तसेच छिद्रे पडलेली दिसून आली. या अळीने पाने खाण्यास सुरुवात केली आहे. ही अळी एवढी आक्रमक असते की, काही मिनिटांत लाखो हेक्टर क्षेत्रावर बाधा पोहोचू शकते. यामुळे आता या अमेरिकन लष्करी अळीला रोखण्याचे राज्याच्या कृषी विभागासह मका उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
२०१३-१४ या वर्षात जिल्ह्यात ७ लाख ३७ हजार ४४१ मे. टन मका उत्पादन झाले होते. हा एक विक्रमच होय. मागील वर्षी दुष्काळाचा फटका उत्पादनाला बसला होता. २ लाख ३० हजार हेक्टरवर २ लाख ६७ हजार मे.टन मका उत्पादन झाले होते. यंदा जिल्ह्यात २ लाख ३९ हजार हेक्टरवर मका पेरणी प्रस्तावित आहे. यंदा उशिराने पाऊस पडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत मक्याची पेरणी किती झाली याची आकडेवारी अजून प्राप्त झाली नाही. मात्र, अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता ज्यांनी अजून मक्याची लागवड केली नाही, त्यांनी दुसऱ्या पिकांचा विचार करावा, असे आवाहन गंजेवार यांनी केले.
अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना
- मका लागवड केल्यानंतर १० ते १५ दिवसांत लगेच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव सुरू होतो. यामुळे तात्काळ गावातील सर्व शेतकऱ्यांनी शेतात स्पोडोल्युरसह कामगंध सापळा लावून मोठ्या प्रमाणात पंतग मारणे (मास ट्रॅपिंग करणे)आवश्यक आहे.
- मका बियाण्यास सायनॅनट्रिनिलीप्रोल या रसायनाची बीज प्रक्रिया करणे.
- कोष उघडे पडून मरत असल्याने खोल नांगरट करणे आवश्यक आहे.४सध्या लिंबाच्या झाडावर उपलब्ध असलेली लिंबोळी गोळा करून घरी ५ टक्के निंबोळी अर्क तयार करून त्यासोबत बीटी या कीडनाशकाने मक्याचे रोप १० दिवसांपासून दर १० ते १५ दिवसांनी फवारणीने प्रथम दोनदा धुवून काढल्यास पानावरील अंडी, अळ्या यांचा नाश करून पुढील प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो.
- अमेरिकन लष्करी अळीला सलग मका पिकावर अंडे घालणे आवडत असल्याने मक्यामध्ये ४:२ प्रमाणात तूर, मूग, उडीद, चवळी इ. आंतरपीक म्हणून लावावेत. ४मका पिकांसोबत चवळी लावल्यास मावा येऊन त्यावर नैसर्गिकरीत्या मोठ्या प्रमाणात तिला कीड येते व ती अळ्यांवर नियंत्रण करू शकते.
- जमिनीवर गुळाचे पाणी फवारल्यास मुंगळे येऊन अळ्यांना नियंत्रित करतील.
मक्यासह ऊस, ज्वारीला धोका
किडीचा पतंग एका रात्रीत १०० किमी तर १५ दिवसांत २ हजार किमीचा प्रवास करतो. तर मादी पतंग या कालावधीत ६ ते ७ वेळा प्रत्येकी ३०० अंडीपुंज याप्रमाणे २ हजार अंडी देऊ शकते. तसेच ही कीड ८० विविध प्रकारच्या वनस्पतीवर जगत असल्याने मक्यासह ऊस, ज्वारी व इतर तृणधान्य पिकांवर प्रादूर्भाव होण्याची शक्यता आहे. जागतिक अन्न व कृषी संघटनेने अननसुरक्षा धोका निर्माण करणारी कीड असे संबोधले आहे. त्यामुळे या किडीचे व्यवस्थापन गांभीर्याने करणे आवश्यक आहे.