भयंकर! सख्ख्या बापाने ५ हजारांत विकले, त्या चिमूकलीची दत्तक पालकांनी क्रूरपणे केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:43 IST2025-03-27T19:42:56+5:302025-03-27T19:43:35+5:30
५ हजारांत विकत घेतले पण बॉण्डवर दत्तक घेतल्याचा केला करार

भयंकर! सख्ख्या बापाने ५ हजारांत विकले, त्या चिमूकलीची दत्तक पालकांनी क्रूरपणे केली हत्या
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड: ज्या आई वडिलांनी ४ वर्षीय चिमुकल्या आयातची निर्घृण हत्या केली त्या वडील शेख फईम, व आई फौजिया शेख या दाम्पत्याला चार मुलं आहेत मुलगी पाहिजे म्हणून या दोघांनी जालना येथील एका ५ मुली असलेल्या आईशी संपर्क करून ५ हजारात आयातला सहा महिन्यांपूर्वी विकत घेतले होते.व १०० रुपयांच्या बॉण्ड पेपर वर दत्तक घेतल्याचा करार केला होता.
जालना येथील नाजीयाचे पाहिले लग्न जालना येथील शेख नसीम अब्दुल कायुम वय ३५ वर्ष यांच्या सोबत १५ वर्षांपूर्वी झाले होते. त्यातून या दाम्पत्याला पाच मुली होत्या व तिला पती शेख नसीम वागवत नसल्याने नाजीया व शेख नसीम यांचा जून २०२४ मध्ये घटस्फोट झाला होता चार मुली या नाजीया कडे आहेत तर एक मुलगी ४ वर्षाय आयात ही वडील शेख नसीमकडे होती. नसीम हा दारू पिण्याच्या सवयीचा होता आणि मुलगी आयातला भीक मागायला लावत होता. त्यानंतर एका मध्यस्थी मार्फत शेख नसीम व आरोपी शेख फईम यांची जालना येथे एका जमात मध्ये भेट झाली. आयातला शेख नासिमने ५ हजारात शेख फईमला ६ महिन्यांपूर्वी विकले होते. दोघांनी एका १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर आयातला दत्तक देत असल्याचा करार केला. तेव्हापासून आयात ही आरोपी फौजिया व शेख फईम सोबत राहत होती. त्यानंतर आयातची मूळ आई नाजीया हिने जालना येथील फेरोजखान सोबत लग्न केले. त्या चार मुलीचे लालन पालन हे दाम्पत्य करत असल्याचे नाजीयाने पोलिसांना सांगितले आहे.
निर्दयतेचा कळस! दत्तक चिमुकलीला दिले चटके, हातपाय मोडून आई वडिलांनीच केला खून
मुलीची हत्या करणारे वडील शेख फईम व फौजिया शेख फाईम हे दाम्पत्य अजिंठा येथील इंदिरानगर मध्ये राहत होते. मोलमजुरी करून पोट भरत होते. जेव्हा पासून फईमने आयातया चिमुकल्या मुलीला दत्तक घेतले. तेव्हा पासून पतीपत्नीत खटके उडत होते. त्यामुळे त्यांनी १५ दिवसांपूर्वी अजिंठा सोडला व ते सिल्लोडला राहायला आले होते. फौजियाला पतीने मुलीला दत्तक घेतल्याचे आवडले नव्हते. यामुळे कधी पत्नी फौजिया तर कधी पती शेख फईम हे दोघे तिचा छळ करत होते. त्यातून तिची हत्या झाली असावी अशी चर्चा आहे.
सिल्लोड शहर पोलिसांनी मयत आयातची मूळ आई नाजीयाला सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आणून तिचा जाब जवाब घेतला असता तिने यात माझा दोष नाही तिला माझ्या पूर्वीच्या पतीने (शेख नसीम) याने विकले होते मी नाही विकले मी आता दुसऱ्या पती फेरोज सोबत राहत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले. मला पहिल्या पतीपासून पाच मुली झाल्या पण पती दारू पिऊन येत असल्याने आमचे जमले नाही म्हणून आम्ही घटस्फोट घेतला आहे, अशी माहिती आयातची मूळ आई नाजीया हिने पोलिसांना दिली.
तपासात आरोपी वाढतील
जालना येथील नाजीयाची आणि आरोपींची भेट कशी झाली. कुणाच्या मध्यस्थीने हा सौदा झाला आणि दत्तक घेतले.नाजीयाने मुलीला विकले की शेख नसीम याने विकले त्यांनी दत्तक दिले ते कोणत्या पद्धतीने दिले. तिचा खून का केला. हा तपासाचा भाग आहे. फिंगर प्रिंट एक्सपर्ट टीम बोलावण्यात आली असून यात आणखी आरोपी वाढू शकतात का हे तपासात स्पष्ट होईल. प्राथमिक दृष्ट्या वैद्यकीय अधिकाऱ्यानुसार मारहाण झाल्याने तिचा मृत्यू झाला.
- मयंक माधव, प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक, सिल्लोड शहर पोलीस ठाणे