एएस क्लबजवळ भीषण अपघात, भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत मोपेडस्वार महिला जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 01:19 PM2024-12-03T13:19:47+5:302024-12-03T13:20:29+5:30
पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले आहे.
वाळूज महानगर : धुळे-सोलापूर महामार्गावरील एएस क्लब ओहर ब्रिजवरून कांचनवाडीच्या दिशेने जाणाऱ्या मोपेडला ( क्रमांक एमएच-२३, एव्ही-३३५१) भरधाव वेगातील विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोपेडस्वार महिलेचा ट्रॅक्टरच्या मागील चाकखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. जयश्री भड असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तिसगाव चौक परिसरातील समर्थ रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या जयश्री भड या त्यांचे नातेवाईक सुहास सुपेकर यांच्यासोबत मोपेडवर धुळे-सोलापूर महामार्गाने कांचनवाडीच्या दिशेने निघाल्या होत्या. एएस क्लब येथील ओव्हर ब्रिजवरून खाली उतरत असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रॅक्टरने त्यांच्या मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात रस्त्यावर पडलेल्या जयश्री यांच्या डोक्यावरून ट्रॅक्टर ट्रॉलीचे मागील चाक गेले. डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबतचे सुपेकर किरकोळ जखमी झाले.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळतात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, फौजदार मनोज घोडके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेतले आहे.