घोड्यास दयामरण : भावनाविवश मुलाने फोनवर विचारले ‘साहेब...आमचा घोडा गेला का?’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 12:52 PM2020-02-28T12:52:16+5:302020-02-28T12:55:20+5:30
‘ग्लँडर्स’ची लागण झालेल्या एका घोड्याला दिले भुलीच्या इंजेक्शनसह अन्य एक इंजेक्शन
औरंगाबाद : ‘ग्लँडर्स’ आजाराची लागण झालेल्या एका घोड्याला गुरुवारी पडेगाव परिसरात दयामरण देण्यात आले. हा क्षण पाहताना घोड्याचा मालक आणि त्यांच्या तरुण मुलाला भावना अनावर झाल्या. विरहाच्या दु:खाने तो तरुण दयामरणाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच निघून गेला. त्यानंतर त्याने पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना फोन करून ‘साहेब...आमचा घोडा गेला का?’ अशी विचारणा केली. तेव्हा या प्रसंगाने अधिकाऱ्यांचेही मन हळहळले.
कोकणवाडीतील दोन घोड्यांना ग्लँडर्स आजारांची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत त्या दोन्हीही घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार बुधवारी पडेगाव येथील कचरा प्रक्रिया केंद्राच्या परिसरात दयामरण देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह घोड्याचे मालक जनार्दन तांबे, त्यांचा मुलगा नीलेश तांबे यांची उपस्थिती होती.
घोड्याला भुलीच्या इंजेक्शनसह अन्य एक इंजेक्शन देण्यात आले. यासाठी जवळपास ८ फूट खड्डा खोदण्यात आला. दयामरणाची वेळ जसजशी जवळ येत होती, तशा तांबे यांच्या भावना अनावरण होत होत्या. ही पूर्ण प्रक्रिया पाहणे त्यांना कठीण जात होते. ज्या घोड्याला प्रेमाने वाढविले, त्याचा मृत्यू डोळ्यादेखत पाहणे टाळून नीलेश तांबे (२२) हे निघून गेले. त्यांनी नंतर फोन करून विचारणा केली.
दुसऱ्या घोड्यालाही देणार दयामरण
दुसऱ्या घोड्यालाही दयामरण देण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, असे पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी म्हणाले.
‘ग्लँडर्स’ आजारांच्या घोड्यांना इंग्रजांच्या काळात गोळी मारत
औरंगाबादेत पहिल्यांदाच ‘ग्लँडर्स’ या आजाराची लागण झालेल्या दोन घोड्यांना दयामरण देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, इंग्रजांच्या काळात हा आजार होणाऱ्या घोड्यांना थेट गोळी मारली जात. विजेचा धक्का, डोंगरावरून ढकलूनही त्यांचे प्राण घेतले जात. कायद्यातील दुरुस्तीमुळे आता घोड्यांना दयामरण दिले जाते. यामुळे या मुक्या प्राण्यांच्या वेदना कमी होण्यासह हा आजार माणसांत पसरण्याचाही धोका टळत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान आणि अन्य पर्यटनस्थळांवर घोडेस्वारीसाठी मोठ्या प्रमाणात घोडे पाळले जातात. पावसाळ्यात काही काम नसते. तेव्हा या कालावधीत मोकाट फिरणाऱ्या घोड्यांना हा आजार होतो. पाचगणीत येथे घोड्यांची संख्या मोठी आहे. २००६ साली १५ घोड्यांना या आजाराची लागण झाल्याचे निदर्शनास आले हाते. या घोड्यांनाही दयामरण देण्यात आले होते. औरंगाबादेत पहिल्यांदाच या आजारांचे घोडे आढळून आले.
कायद्यात झाली सुधारणा
‘ग्लँडर्स फार्सी कायदा १८९९’ नुसार इंग्रजांच्या काळात या प्राण्याला गोळी मारून ठार करण्यात येत, यानंतर पुढे कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. आता इन्फेक्शियस अॅण्ड काँटेजीएस डिसिस प्रिव्हेन्शन अॅण्ड कंट्रोल अॅक्ट-२००९ आहे. या रोगाची लागण झाल्याचे निदान झाल्यानंतर त्याला दयामरण देण्यासाठी शासनाच्या नियमानुसार समिती गठीत करण्यात येते. समिती प्राण्याचे रक्त तपासते. पशुवैद्यकीय यंत्रणेचा अहवाल घेतला जातो. समितीचा अहवाल आल्यानंतर मग त्याला मरण होताना वेदना होऊ नयेत म्हणून भुलीचे इंजेक्शन देण्यात येते. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली जाते. ‘ग्लँडर्स’या रोगाबाबत आजही औषध किंवा लस उपलब्ध नाही.
काय असतो धोका?
ग्लँडर्स आजार संसर्गजन्य आजार आहे. या आजारामुळे घोड्यांच्या शरीरावर मोठमोठे फोड येतात. फोड फुटल्यानंतर त्यातून पू आणि रक्त बाहेर पडते. या रक्त आणि पू यामुळेच ग्लँडर्सचा विषाणू इतर प्राण्यांबरोबर माणसाच्या शरीरात जाण्याचा धोका असतो. त्यामुळे निदान होताच आजारी घोड्याला इतर घोडे आणि मानवी वस्तीपासून दूर ठेवले जाते. पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय व चिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी म्हणाले, घोड्यांपासून हा आजार माणसांत पसरण्याची शक्यता असते. माणसाला झाला तर इतर व्यक्तींमध्ये पसरू शकतो. त्यामुळे खबरदारी घेतली जाते.