दर्शनासाठी टांग्याने येणारे भाविक अन् लाकडी पाळणा...
By Admin | Published: September 23, 2014 01:25 AM2014-09-23T01:25:57+5:302014-09-23T01:39:01+5:30
संतोष हिरेमठ , औरंगाबाद नवरात्रोत्सवात भरणाऱ्या कर्णपुरा यात्रेला अनेक वर्षांचा इतिहास आहे. चारशे वर्षांपूर्वी राजा कर्णसिंह यांनी देवीची स्थापना केली. यात्रेची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे.
संतोष हिरेमठ , औरंगाबाद
नवरात्रोत्सवात भरणाऱ्या कर्णपुरा यात्रेला अनेक वर्षांचा इतिहास आहे. चारशे वर्षांपूर्वी राजा कर्णसिंह यांनी देवीची स्थापना केली. यात्रेची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. शहर छोटे असताना मंदिराच्या परिसरातच यात्रा भरायची. यात्रेला टांग्याने भाविक येत होते. त्यावेळी लाकडाचा चार आसनी पाळणा असायचा. बघता बघता शहर वाढले आणि यात्रेचे स्वरूपही भव्य झाले. आज भव्य रहाटपाळणे आणि अन्य खेळणी मोठ्या प्रमाणात येतात. दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याचे मंदिराचे पुजारी पोपटराव दानवे यांनी सांगितले.
कर्णपुरा मंदिर शहरातील प्राचीन असे देवस्थान आहे. मराठवाड्यातील फार मोठी यात्रा म्हणून नवरात्रोत्सवात भरणारी कर्णपुरा यात्रेची ख्याती आहे. यात्रेनिमित्त दरवर्षी कर्णपुऱ्यातील देवीच्या दर्शनासाठी मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून दररोज लाखो भाविक येतात. यात्रेसाठी अवघे क ाही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मंदिर संस्थानाकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून, भाविकांना सहजरीत्या दर्शन घेता यावे, यासाठी लाकडी खांबांद्वारे दर्शन रांगेची व्यवस्था केली जात आहे. भव्य असा मंडप उभारण्यात आला आहे. विविध रहाटपाळणे, मनोरंजनाचे विविध खेळ, मुलांसाठी खेळणी, पूजेसाठी लागणारे साहित्य, सजावटीचे साहित्य, विविध घरगुती साहित्य, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू करण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता घटस्थापनेने यात्रेला सुरुवात होईल. नवरात्रोत्सवात दररोज पहाटे ३ वाजता देवीची आरती होईल. पहिल्या दिवसापासूनच दर्शनासाठी भाविक गर्दी करीत असल्याने यात्रेच्या कालावधीत संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे.