शहरातील मोठ्या रस्त्यांचे घोडे अडले
By Admin | Published: June 28, 2017 12:50 AM2017-06-28T00:50:18+5:302017-06-28T00:51:18+5:30
औरंगाबाद : सोमवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची एक बैठक नागपुरात पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : नॅशनल हायवे अॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या दिल्लीतील मुख्यालयात महाराष्ट्रातील बहुतांश प्रकल्पांना ब्रेक लागल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांची एक बैठक नागपुरात पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घाईघाईमध्ये प्रकल्पांचे सादरीकरण करून आढावा घेण्यात आल्यामुळे जालना रोड आणि बीड बायपासच्या निविदांबाबत चर्चा होऊ शकली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्यातील अकोला, नागपूर, खामगाव, सोलापूर, औरंगाबादमधील काही महत्त्वाच्या प्रकल्पांवर निर्णय होत नसल्याने ती कामे रेंगाळली आहेत.
औरंगाबादमधील जालना रोड आणि बीड बायपास रुंदीकरणाच्या सुमारे ८०० कोटी रुपयांच्या कामांचा डीपीआर देऊन वर्षे होत आले आहेत. बैठकीत राज्यातील सर्व प्रकल्पांचा धावता आढावा घेण्यात आला. एनएचएआयचे केंद्रीय संचालक मलिक यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी दीपककुमार यांची वर्णी लागली आहे. त्यांनी मंगळवारी सर्व प्रादेशिकप्रमुखांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून बैठक घेतली.
प्रकल्पांना गती द्या
राज्यातील प्रकल्पांना गती देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्या. या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्यासह एनएचएआयचे प्रकल्प संचालक यशवंत घोटकर आदींची उपस्थिती होती. विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी सांगितले, पूर्ण राज्यातील प्रादेशिक विभागातील प्रकल्पांसाठी ती बैठक होती. सर्व कामांची देखभाल करून निर्धारित काळात ती कामे पूर्ण करण्यासाठी लक्ष दिले जावे, अशा सूचना बैठकीत करण्यात आल्या. सध्या सर्व प्रकल्पांची काय स्थिती आहे, याची माहिती एनएचएआयच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.