घोडेले, तनवणींनी म्हटले "जम गया काम"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:06 AM2021-01-15T04:06:17+5:302021-01-15T04:06:17+5:30

औरंगाबाद : भाजपाला राम राम म्हणत पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी कमी हवेतही, खाली वर ...

Horses, Tanwani says "Jam Gaya Kaam" | घोडेले, तनवणींनी म्हटले "जम गया काम"

घोडेले, तनवणींनी म्हटले "जम गया काम"

googlenewsNext

औरंगाबाद : भाजपाला राम राम म्हणत पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतलेले माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी कमी हवेतही, खाली वर गोता मारत पेजबाजी लढवून प्रतिस्पर्धी पतंग कापला. तेव्हा त्यांची सादी लपेटणारे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी त्यांचे कौतुक करताना ''वाह क्या बात है, जम गया काम'' अशी उत्स्फूर्त दाद दिली. त्यांच्या संवादाने उपस्थितांचेही कान टवकारले. जो तो याचा संबंध आपल्यापरीने आगामी मनपा निवडणुकीशी लावत होता.

प्रसंग होता, संक्रांतीनिमित्त गोमटेश मार्केट येथे तनवाणी सोशल फोरमतर्फे आयोजित पतंगबाजीचा. सकाळपासूनच येथे तनवाणी मित्र परिवार, पत्रकार, व्यापारी पतंग उडविण्यासाठी येत होते. किशनचंद तनवाणी, राजू तनवाणी पेचबाजीचा आनंद लुटत असताना, माजी नगरसेवक राजू वैद्य आले. त्यांनी पतंग उडविला नाही, पण आगामी मनपा निवडणुकीच्या चर्चेचे पतंग त्यांनी पेलले. त्यानंतर माजी महापौर नंदकुमार घोडेले आले. पतंगबाजीत हातखंडा असलेल्या तनवाणी यांनी कमी हवेतही पतंग उंच पिलवला होता. तनवाणींची ही मास्टरी पाहून घोडेले यांनाही राहवले नाही. त्यांनी पतंग उडविण्याऐवजी तनवाणींची चक्री सांभाळली. तनवाणी यांनी ढील देत देत पतंग उंचावर नेला आणि एक पतंग काटला. तेव्हा घोडेले यांनी ‘जम गया काम' अशी दाद दिली. यामुळे उपस्थितांना चर्चेला विषयच मिळाला.

आमदार प्रदीप जयस्वाल हेसुद्धा पतंगबाजीत माहीर. त्यांनीही पतंग उडविला. माजी खासदार चंद्रकांत खैरेही आवर्जून आले होते. शहरातील कोणत्या वॉर्डात माजी नगरसेवकांवर संक्रांत येणार व कोणाची दिवाळी साजरी होणार, येथपासून ते कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील व अपक्षांना कुठे लॉटरी लागेल येथपर्यंत चर्चा रंगली होती. कोण कोण बंडखोरी करून निवडणुकीच्या आखाड्यात उतरू शकतो, याचेही अनुमान लावले जात होते. पतंग महोत्सवाच्या निमित्ताने रंगलेली ही राजकीय चर्चा पाहता, शहराचे राजकीय तापमान तापू लागलेय हे नक्कीच.

Web Title: Horses, Tanwani says "Jam Gaya Kaam"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.