कचरा संकलन करणाऱ्या कंपनीची मनपाला हूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:21 AM2019-01-28T00:21:35+5:302019-01-28T00:22:04+5:30
शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे २७ जानेवारीपासून कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते; मात्र कंपनीने हात झटकले.
औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा उचलण्याची जबाबदारी बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीवर टाकण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपासून कंपनी काम करण्यास टाळाटाळ करीत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने आणलेल्या वाहनांचे पूजन करण्यात आले. दुसºया दिवशी म्हणजे २७ जानेवारीपासून कंपनीने काम सुरू करणे अपेक्षित होते; मात्र कंपनीने हात झटकले.
शहरात दररोज ४५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. डोअर टू डोअर कलेक्शन करण्याची जबाबदारी महापालिकेने बंगळुरू येथील कंपनीला दिली आहे. कंपनीने शहरातील १ मेट्रिक टन कचरा जमा केल्यास मनपा कंपनीला १८६३ रुपये देणार आहे. तीन महिन्यांपूर्वी मनपाने कंपनीला वर्क आॅर्डर दिली आहे. निविदेतील अटी-शर्थीनुसार कंपनीने स्वत:च्या मालकीची नवीन वाहने आणावीत. साधारणपणे ३०० रिक्षा, मोठी वाहने किमान १०० असावीत, असे नमूद केले आहे. कंपनीने आतापर्यंत ५० टक्केच वाहने आणली आहेत. वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध नाही, मनपाने जागा द्यावी, अशी मागणी कंपनीने केली आहे. कंपनीने त्वरित काम सुरू करावे, अशी मनपाची इच्छा आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी काम सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहे. मनपा प्रशासनाने आतापर्यंत तीन तारखा कंपनीला दिल्या. एकाही तारखेला कंपनीने काम सुरू केलेले नाही. प्रजासत्ताकदिनी बळजबरी महापालिकेने कंपनीच्या वाहनांचे पूजन करून कामाचा शुभारंभ झाला असे जाहीर केले. २७ जानेवारी रोजी कंपनी काम सुरू करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारी कंपनीने शहरातील एक किलो कचराही उचलला नाही.
९०० कर्मचाºयांची गरज
शहरातील ११५ वॉर्डांमधील प्रत्येक घरातून कचरा जमा करण्यासाठी कंपनीला किमान ९०० कर्मचारी लागणार आहेत. कंपनीकडे आतापर्यंत ४०० ते ४५० कर्मचारी आहेत. उर्वरित मनुष्यबळ कंपनीला मिळालेच नाही. कचरा उचलणारे कामगार सहजासहजी मिळायला तयार नाहीत.
कंपनीवर दबाव
सिडको-हडकोमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून अस्थायी कामगार काम करीत आहेत. या कामगारांची संख्या जवळपास ४०० आहे. बचत गटामार्फत अनेक कर्मचारी नेमले आहेत. हे सर्व कर्मचारी कंपनीने कोणत्याही अटीशिवाय घ्यावेत म्हणून कंपनीवर दबाव टाकण्यात येत आहे.