रुग्णालय इमारती जीर्ण
By Admin | Published: January 29, 2017 11:58 PM2017-01-29T23:58:10+5:302017-01-29T23:58:46+5:30
बीड जिल्ह्यातील ३ ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत.
व्यंकटेश वैष्णव बीड
जिल्ह्यातील ३ ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणच्या इमारतींना पावसाळ्यात गळती लागते. याबाबत शासनाकडे नव्या इमारतीचा प्रस्ताव पाठवून देखील याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत आहे.
रायमोहा, चिंचवन व तालखेड या तीन ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतींचे बांधकाम होऊन ४० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. आता या इमारती जीर्ण झाल्या आहेत. शिवाय, जुन्या स्ट्रक्चरनुसार इमारतींचे बांधकाम असल्याने आरोग्य सेवा पुरविण्यासाठी डॉक्टरांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. विशेष म्हणजे, या तिन्ही ठिकाणच्या वैद्यकीय अधीक्षकांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे इमारतीच्या पडझडीबाबत अहवाल सादर केलेला आहे. मात्र, राज्यस्तरावरून या इमारत बांधकामाच्या कुठल्याच हालचाली मागील अनेक वर्षांपासून होत नाहीत.