आनंदीबाई जोशी पुरस्काराने रुग्णालयांचा गौरव
By Admin | Published: March 25, 2017 10:51 PM2017-03-25T22:51:31+5:302017-03-25T22:55:09+5:30
उस्मानाबाद : राज्य शासनाच्या वतीने देशाच्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माता बाल संगोपन व उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल आरोग्य केंद्रांचा सन्मान करण्यात येतो़
उस्मानाबाद : राज्य शासनाच्या वतीने देशाच्या पहिला महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माता बाल संगोपन व उत्कृष्ठ आरोग्य सेवेबद्दल आरोग्य केंद्रांचा सन्मान करण्यात येतो़ या योजनेंतर्गत सन २०१६-१७ या वर्षातील जिल्हास्तरीय पुरस्कार उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयासह तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व तीन उपकेंद्रांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले़ याशिवाय सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पुरस्कार, कायाकल्प पुरस्काराचे वितरण करून आशा कार्यकर्तींचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला़
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी जि़प़अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता़ कार्यक्रमास उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी आनंद रायते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़व्ही़वडगावे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी डॉ़ आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रथम आलेल्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयासह माणकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्र, येणेगूर प्राथमिक आरोग्य केंद्र, अणदूर प्राथमिक आरोग्य केंद्र, दुधोडी उपकेंद्र, मस्सा (खं़) उपकेंद्र, चिंचोली (ज़) उपकेंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात आला़
यावेळी उत्कृष्ठ आशा स्वयंसेविका पुरस्कारात कालिंदा धनंजय कदम यांना प्रथम तर विजया लक्ष्मण रोडगे यांना द्वितीय पुरस्कार प्रदान करण्यात आला़ तालुकास्तरीय आशा पुरस्कार व नाविन्यपूर्ण पुरस्कार मंगल प्रताप वाडीकर, जिजाबाई नाना शिरसाठे यांना प्रदान करण्यात आला़ गटप्रवर्तक पुरस्कार शाहीन ईलाही शेख यांना प्रथम, प्रमिला हरिश्चंद्र पवार यांना द्वितीय, श्रीदेवी मारुती चौरे यांना तृतीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कायाकल्प कार्यक्रमांतर्गत आसू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम तर वालवड व पाडोळी प्राथमिक आरोग्य केंद्रास उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले़ राज्यस्तरीय द्वितीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला़ यावेळी सहा जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. एस. फुलारी, अति. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. पांचाळ, सांख्यिकी अधिकारी कवितके, तालुका आरोग्य अधिकारी ए़यू़लाकाळ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरी यांनी केले तर डॉ. के. के. मिटकरी यांनी उपस्थितांचे मानले.