घाटी रुग्णालयाच्या ‘सुपर स्पेशालिटी’त रुग्णसेवेला उजाडणार २०१९
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 05:54 PM2018-05-04T17:54:27+5:302018-05-04T17:55:48+5:30
घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागात रुग्णसेवेला २०१९ उजाडण्याची चिन्हे आहेत.
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात केंद्र आणि राज्य सरकारच्या साह्याने उभारण्यात येणाऱ्या स्वतंत्र सुपर स्पेशालिटी विभागात रुग्णसेवेला २०१९ उजाडण्याची चिन्हे आहेत. पाच मजली इमारतीचे आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३० टक्के काम पूर्ण होण्यासाठी आणखी पाच महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
२५३ खाटांच्या सुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे काम डिसेंबर २०१७ अखेर करण्याची मुदत होती; परंतु अनेक कारणांमुळे हे काम कासवगतीने सुरू आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मार्चअखेर या इमारतीचे काम पूर्ण होईल,असे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले होते; परंतु या इमारतीचे काम अजूनही सुरूच आहे. अद्यापही ३० टक्के कामे या ठिकाणी शिल्लक आहे. जलवाहिनी, ड्रेनेजलाईन आदी कामांचा त्यात समावेश आहे. सगळी कामे पूर्ण होऊन रुग्णसेवेसाठी इमारत सज्ज होण्यासाठी होण्यासाठी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिना लागेल,असे घाटी प्रशासनाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे पदनिर्मिती आणि पदस्थापनेची देखील प्रतीक्षा आहे. हा प्रस्ताव शासनस्तरावर पडून आहे.
या विभागात हृदयरोग, मेंदूविकार, मूत्रपिंड विकार यांसह विविध सुपर स्पेशालिटीचे सर्व उपचार उपलब्ध केले जाणार आहेत. विभागाच्या इमारतीचे काम पूर्ण होताच विभाग रुग्णसेवेत दाखल होणे आवश्यक आहे; परंतु इमारत पूर्ण झाल्यानंतरही रुग्णसेवेची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लवकरच कामे पूर्ण
सुपर स्पेशालिटी विभागाच्या इमारतीचे काम मार्च महिनाअखेर पूर्ण होणार होते; परंतु कामे पूर्ण होण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे. आॅक्टोबरपर्यंत सगळी कामे पूर्ण होतील,अशी अपेक्षा आहे. पदासंदर्भातही प्रस्ताव देण्यात आलेला आहे.
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय