रुग्णालय की नशेखोरांचा अड्डा; घाटी रुग्णालयातून गांजा, कटरसह तिघे ताब्यात
By संतोष हिरेमठ | Published: October 27, 2022 10:51 AM2022-10-27T10:51:48+5:302022-10-27T10:52:26+5:30
सुरक्षारक्षकांनी तिघांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात गांज्याच्या पुडीसह नशेत फिरणाऱ्या तिघांना सुरक्षारक्षकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. रुग्णालय की नशेखोरांचा अड्डा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. सुरक्षेचा प्रश्नही पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घाटीत पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास आरएमओ कार्यालयाच्या बाजूला ओपीडी जवळ ३ व्यक्ती संशयीत अवस्थेत असल्याचे सुरक्षारक्षक योगेश शेंडगे यांना आढळून आले. त्या वेळी त्यांनी तिघांना ताब्यात घेत स्टाफ रूममध्ये आणले. सदर व्यक्तींची चौकशी केली असता संदेश गणेश खडसे या व्यक्तीकडे गांज्याच्या पुड्या आढळून आल्या. तर सोबतचे राजू साहेबराव घुले तसेच प्रफुल अजय पाखरे हे नशेमध्ये आढळून आले. ही माहिती एसएसओ मालकर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनावरून सदर माहिती निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. तसेच बेगमपुरा पोलीस ठाण्यालाही माहिती दिली.
काही वेळेत बेगमपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भालेराव, कर्मचारी शेख आले. त्यांनी त्या व्यक्तींची चौकशी केली असता त्यांच्याकडे गांज्याच्या पुड्या, कटर, काही चाव्या आढळून आल्या. ही कार्यवाही सुरक्षा पर्यवेक्षक एच. एम. बचाटे, क्युआरटी गणेश राठोड, आत्माराम चव्हाण, योगेश शेंडगे, कल्याण लोखंडे, सोमनाथ उत्तम राठोड, निलेश निक्कम उपस्थित होते.