घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:06 AM2018-10-17T00:06:21+5:302018-10-17T00:06:56+5:30

गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी सुरक्षेच्या कारणावरून मंगळवारी (दि.१६) सकाळी ‘मास बंक ’ आंदोलन पुकारले. दोनशेवर डॉक्टर आंदोलनात सहभागी झाल्याने घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत झाली. परिणामी, रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

 Hospital services in the valley disrupted | घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत

घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत

googlenewsNext
ठळक मुद्देनिवासी डॉक्टरांचा मास बंक : वरिष्ठ डॉक्टरांच्या खाद्यांवर सेवेचा भार, परिचारिकांनीही केले प्रयत्न

औरंगाबाद : गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी सुरक्षेच्या कारणावरून मंगळवारी (दि.१६) सकाळी ‘मास बंक ’ आंदोलन पुकारले. दोनशेवर डॉक्टरआंदोलनात सहभागी झाल्याने घाटीतील रुग्णसेवा विस्कळीत झाली. परिणामी, रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.
घाटीतील निवासी डॉक्टरांनी सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन मंगळवारी सकाळपासून कामावर गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला. घाटीत बाह्यरुग्ण विभागात दररोज सकाळी दोन हजारांवर रुग्ण येतात, तर एक हजारांवर रुग्ण वॉर्डात दाखल असतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी ओपीडीत रुग्णांची गर्दी होती. या रुग्णांना डॉक्टरांच्या आंदोलनाचा फटका बसला. निवासी डॉक्टरांच्या आंदोलनामुळे रुग्णसेवेसाठी घाटी प्रशासनाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, हाऊस आॅफिसर, इंटर्न आणि वरिष्ठ डॉक्टरांना पाचारण केले. या सर्वांनी आणि परिचारिकांनी रुग्णसेवा सुरळीत ठेवण्यासाठी परिश्रम घेतले; परंतु डॉक्टरांची संख्या अपुरी पडल्याने रुग्णांना उपचारासाठी तासन्तास ताटकळावे लागले.
बाह्यरुग्ण विभाग, सर्जिकल इमारतीतील विविध वॉर्डांत निवासी डॉक्टरांअभावी रुग्णसेवेची तारांबळ उडाली. केवळ अत्यावश्यक रुग्णसेवेला प्राधान्य देण्यात आले. आंदोलनाचे कारण पुढे करून उपचारास टाळाटाळ केल्याचा आरोपही काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केला.
सुरक्षाव्यवस्थेची पोलखोल
बाह्यरुग्ण विभाग, सर्जिकल इमारतीत जाऊन सर्व निवासी डॉक्टरांनी त्यांच्या सहकाऱ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात येण्याचे आवाहन केले. त्यानुसार महाविद्यालय परिसरात सर्व निवासी डॉक्टर एकत्र जमले. डॉक्टरांनी घाटीतील सुरक्षाव्यवस्थेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरक्षाव्यवस्थेचा निवासी डॉक्टरांनी सोमवारी रात्री प्रत्यक्ष आढावा घेतला. तेव्हा गांजा ओढणाºया एका व्यक्तीस पकडून सुरक्षारक्षकांच्या स्वाधीन केले. ही सुरक्षाव्यवस्थेची पोलखोल असल्याचे डॉक्टरांनी म्हटले.
तिसºया घटनेत बाचाबाची
घाटीत २४ तासांत दोन घटनांत निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. या दोन घटनांबरोबर तिसरी घटनाही घडली असून, नातेवाईकांनी आयसीयूतील डॉक्टरांबरोबर बाचाबाची केल्याचे निवासी डॉक्टरांनी सांगितले.
सुरक्षेचे आश्वासन कागदावरच,
बाऊन्सर नेमण्याची तयारी
धक्काबुक्कीच्या घटनेनंतर एप्रिलमध्ये निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. तेव्हा घाटीत बाऊन्सर नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती. गेल्या दोन दिवसांतील घटनेनंतर पुन्हा हीच मागणी समोर आली आहे. त्यामुळे अखेर घाटीने बाऊन्सर नेमण्याची तयारी सुरू केली. त्यासाठी ही सेवा देणाºयांशी चर्चा करण्यात आली. सुनियोजित तपास पद्धत, निश्चित वेळेतच नातेवाईकांना रुग्णाला भेटण्याची मुभा, वाहनांवर नियंत्रण, मकाईगेट परिसरातील संरक्षक भिंत बंद करणे, अशा अनेक मागण्यांची पूर्तता घाटी प्रशासनाकडून सहा महिन्यांनंतरही झाली नाही. त्या कागदावरच राहिल्याने डॉक्टरांवर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आली.
५० टक्के डॉक्टर संपावर
घाटीतील केवळ ५० टक्के निवासी डॉक्टर संपावर गेले. शिवाय वरिष्ठ डॉक्टरांनी सेवा दिली. आपत्कालीन सेवा सुरळीत ठेवण्यात आली असून, नियमित रुग्णांचीही ५० टक्क्यांवर तपासणी आणि उपचार झालेले आहेत. निवासी डॉक्टरांच्या मागणीनुसार बाऊन्सर नियुक्त करण्यासंबंधी प्रक्रिया सुरू केली आहे.
-डॉ. भारत सोनवणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक
 

Web Title:  Hospital services in the valley disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.