दवाखान्याचे टेन्शन मिटले; राशन कार्ड कोणतेही असो आता ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत!
By विजय सरवदे | Published: July 11, 2023 07:23 PM2023-07-11T19:23:35+5:302023-07-11T19:23:59+5:30
सर्वच शिधापत्रिकाधारक नागरिकांना मिळणार उपचाराचा लाभ
छत्रपती संभाजीनगर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचारासाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या योजनेचा लाभ आता सरसकट सर्वांनाच मिळणार आहे. राज्यातील केशरी व अंत्योदय शिधापत्रिकाधारकांपुरती मर्यादित असलेली ही योजना आता राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक नागरिकांना लागू झाली आहे.
महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि केंद्र सरकारच्या पंतप्रधान जन आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या दोन योजनांच्या एकत्रीकरणामुळे पूर्वी मिळणारे दीड लाखांचे आरोग्य कवच यापुढे पाच लाखांचे मिळणार आहे. एवढेच नाही, तर उपचारांसाठी रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
काय आहे महात्मा फुले जनआरोग्य योजना?
गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना दर्जेदार आणि मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी ही योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. दारिद्र्यरेषेखालील व दारिद्र्यरेषेवरील नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत.
केशरी, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच मिळायचा लाभ
पूर्वी अन्नपूर्णा योजना, दारिद्र्यरेषेखालील पिवळे, अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड आणि दारिद्र्यरेषेवरील केशरी रेशनकार्ड तसेच ज्या कुटुंबाचे वार्षिक एक लाख उत्पन्न आहे, अशाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळायचा. आता ती अट काढून टाकण्यात आली आहे.
प्रत्येक कुटुंबावर पाच लाखांपर्यंत उपचार
महात्मा फुले जनआरोग्य योजनेला पंतप्रधान जन आरोग्य योजनेची जोड देऊन फक्त पिवळे व केशरी कार्डधारकांनाच नव्हे, तर सर्व रेशनकार्ड धारकांना वैद्यकीय उपचारासाठी पाच लाखांचे आरोग्यसेवा कवच देण्यात येणार आहे.
या ३४ खासगी रुग्णालयांत मिळतील उपचार
जिल्ह्यातील ॲपल हॉस्पिटल, एशियन सिटीकेअर सुपरस्पेशालिटी, औरंगाबाद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, अल्पाइन सुपरस्पेशालिटी, सेच्युरी मल्टीस्पेशालिटी, डॉ. हेडगेवार, डॉ. रुणवाल हृदयम हार्ट केअर सेंटर, दृष्टी आय इन्स्टिट्यूट, डॉ. दहिफळे मल्टीस्पेशालिटी, गणपती आयसीयू अँड मल्टीस्पेशालिटी, आयकॉन मल्टीस्पेशालिटी, इंटरनॅशनल हॉस्पिटल, जे. जे. प्लस, जिल्हा प्लस हॉस्पिटल, कृपामयी हॉस्पिटल, लघाने मल्टीस्पेशालिटी, लाइफलाइन मल्टीस्पेशालिटी, महात्मा गांधी मिशन हॉस्पिटल, एमआयटी हॉस्पिटल, कमलनयन बजाज, माणिक हॉस्पिटल, माऊली हाॅस्पिटल, निमाई चिल्ड्रन हॉस्पिटल, सावजी मल्टीस्पेशालिटी, एडीएच १०० वैजापूर, धूत हॉस्पिटल, साई हॉस्पिटल पैठण, शिवा क्रिटिकल केअर, सिनर्जी हॉस्पिटल, युनायटेड सिग्मा, उत्कर्ष हॉस्पिटल, वाळूज हॉस्पिटल, आनंद चॅरिटेबल ट्रस्टचे आनंद हॉस्पिटल, आदींसह शासकीय वैद्यकीय रुगणालय, घाटी, शासकीय कर्करोग रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयात या योजनेंतर्गत उपचार घेता येतील.