डॉक्टरांना मारहाण करून रुग्णालयात तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:06 AM2021-02-06T04:06:41+5:302021-02-06T04:06:41+5:30
वाळूज महानगर : उपचारासाठी आलेल्या रुग्णाने साथीदाराच्या मदतीने दोन डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण करीत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी ...
वाळूज महानगर : उपचारासाठी आलेल्या रुग्णाने साथीदाराच्या मदतीने दोन डॉक्टरांना शिवीगाळ करून मारहाण करीत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (दि.४) रात्री ८ वाजेच्या सुमारास बजाजनगरातील खासगी रुग्णालयात घडली. या प्रकरणी रुग्ण व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बजाजनगरातील व्हर्टेक्स हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कृष्णा गायकवाड हा दात दुखत असल्याने आला होता. डॉ. हर्षदा इंगोले या प्रोबच्या साहाय्याने तपासणी करीत असताना रुग्ण कृष्णाने त्यांचा हात धरून मला त्रास होत असल्याचे सांगितले. कृष्णा दारूच्या नशेत असल्याचे समजताच डॉ. हर्षदा यांनी त्याला औषधी देऊन सायंकाळी उपचारासाठी बोलावले होते. दरम्यान, कृष्णा रात्री ८ वाजेच्या सुमारास आला. यानंतर डॉ. सय्यद तफजुल यांनी कृष्णाला खुर्चीवर बसवून दातात अडकलेल्या मासाचे हाड काढण्याचा प्रयत्न केला. हाड खूप आतमध्ये अडकल्याने डॉ.सय्यद यांनी कृष्णाला दुसऱ्या दिवशी भूल देऊन उपचार करू, असे सांगितले. या उत्तराने संतप्त झालेल्या कृष्णाने डॉ.सय्यद व डॉ.हर्षदा यांना शिवीगाळ केली. त्याला कंपाउण्डरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यानंतर डॉ.सय्यद हे दुसऱ्या महिला रुग्णांची तपासणी करीत असताना कृष्णाने पुन्हा कॅबिनमध्ये येऊन शिवीगाळ केली.
काही वेळाने कृष्णा रंजीत केरे व अन्य एकाला घेऊन आला. कॅबिनच्या दरवाजाला लाथ मारून रुग्णालयात प्रवेश करून डॉ.सय्यद यांना शिवीगाळ व मारहाण केली. डॉ.स.काजीम अली हे मध्यस्थीसाठी आले असता या तिघांनी त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केली. यानंतर तिघांनी डेंटल चेअर व मशीनची तोडफोड करून टेबलवरील साहित्य अस्त-व्यस्त करून जिवे मारण्याची धमकी देऊन फरार झाले. या प्रकरणी डॉ.सय्यद तफजुल यांच्या फिर्यादीवरून कृष्णा गायकवाड, रंजीत केरे व अनोळखी तरुणाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो ओळ- बजाजनगरात रुग्ण व त्याच्या साथीदाराने खासगी रुग्णालयाची तोडफोड करून डॉक्टरांना मारहाण केली.
फोटो क्रमांक- तोडफोड १/२
------------------