जेवणाच्या बिलावरून हॉटेलमालकाचा चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:07 AM2021-01-25T04:07:05+5:302021-01-25T04:07:05+5:30
खंडाळा : वैजापूर तालुक्यातील खंडाळ्यातील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून हॉटेलमालकासह त्याच्या मुलाने ग्राहकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली ...
खंडाळा : वैजापूर तालुक्यातील खंडाळ्यातील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून हॉटेलमालकासह त्याच्या मुलाने ग्राहकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तंदूर रोटीच्या जागी बटर रोटीचे बिल का लावले याची विचारणा हॉटेलमालकास केल्यानंतर संबंधितांनी जातिवाचक शिवीगाळ करत अमोल बागुल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी बागुल यांच्या फिर्यादीवरून हॉटेलमालक अरुण शिंदे व ऋषी शिंदे यांच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सिंधूबाई बागुल बहुमताने विजयी झाल्याने अमोल बागुलने मित्रांच्या आग्रहा खातर खंडाळ्यातील एका हॉटेलमध्ये मित्रांना जेवण्यास बोलावले होते. शनिवारी रात्री बागुलसह त्यांच्या मित्रांनी हॉटेलमध्ये जेवण केले. जेवणानंतर बिल देताना हॉटेलकडून तंदूर रोटीच्या जागी बटर रोटीचे बिल का लागले याची विचारणा अमोल बागुलने केल्यानंतर त्यास हॉटेलमालक अरुण शिंदे तसेच त्यांचा मुलगा ऋषी शिंदे यांनी जातिवाचक शिवीगाळ करून चाकूहल्ला केला. शिंदे यांनी बागुल यांच्यावर चाकूने डोक्यात, हात, पायावर सपासप वार केले. यात बागुल गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधववर, बीड जमादार मोईस बेग, शकूर बनकर, अमोल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला ताब्यात घेतले. फिर्यादी अमोल बागुल यांनी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना दिलेल्या जबाबाच्या आधारे अरुण शिंदे व ऋषी शिंदे यांच्याविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
मित्रांमुळे वाचलो
आरोपीकडून माझ्या गळ्यावर वार करण्यात आला होता. पण तो वार मी चुकवल्याने माझ्या कानाला लागला. या घटनेत मी हातमध्ये टाकल्याने हातालासुद्धा गंभीर जखम झाली असून, डोक्यालापण मार लागला आहे. आरोपींच्या तावडीतून मला मित्रांनी सोडवत दवाखान्यात आणल्याने मी वाचलो, अशी प्रतिक्रिया अमोल बागुल याने दिली.
---- कॅप्शन : प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या अमोल बागुलवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.